सांगली, मिरजेचे आमदार निवडून येतात कसे बघू : खा. संजय राऊत | पुढारी

सांगली, मिरजेचे आमदार निवडून येतात कसे बघू : खा. संजय राऊत

सांगली : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत टक्केवारीवरून भांडणे सुरू असताना येथील आमदार काय करतात? त्यांचे मौन का आहे? पालकमंत्रिपद असताना मिरजेत साधे रस्ते चांगले नाहीत. सांगली, मिरजेचे भाजपचे आमदार आतापर्यंत शिवसेनेच्या जीवावर निवडून येत होते. आम्ही हा भाग त्यांना आंदण दिला होता. आता ती चूक होणार नाही. शिवसेनेची ताकद कुणाच्याही दावणीला बांधली जाणार नाही. आता आमदार म्हणून ते निवडून कसे येतात तेच बघू, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी येथे दिला. येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा शिवगर्जना मेळावा आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते, संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, मयुर घोडके आदी उपस्थित होते.

सांगली, मिरजेचे आमदार निवडून येतात कसे बघू

खा. संजय राऊत म्हणाले, मिरजेत प्रवेश झाल्यानंतर तेथील खड्डे पाहिले तर तो पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, याची लाज वाटते. शिवसेनेच्या पाठिंबावर ते निवडून येतात. त्यांना यावेळी शिवसेनेची ताकद दाखवून देवू. उद्धव ठाकरे हे रुग्णालयात असताना पक्ष फोडण्याचे काम भाजपच्या इशाऱ्याने झाले. गद्दारांच्यावरील शिक्का आता मातीत गाडल्याशिवाय पुसला जाणार नाही. गद्दारी करून गेलेल्या चोरांशी आमचे भांडण नाही, ते ज्या दावणीला बाधले आहेत, त्या भाजपशी आहे.

राऊत म्हणाले, पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह फौज मैदानात उतरली होती. धनशक्तीचा मोठा वापर करण्यात आला. अक्षरशः पोलिस गाडीतून पैसे वाटण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीने एकजुट दाखवल्याने सत्याचा विजय झाला. हे औटघटकेचे सरकार आहे. सोळा आमदार लवकरच अपात्र ठरतील. हिंमत असेल तर सांगलीसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका घेवून दाखवाव्यात. महाआघाडीची ताकदमुळे कसबाची पुनरावृत्ती येथेही करून दाखवू दिल्लीतील रंगा-बिल्लामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि बाण एकनाथ शिंदेंच्या हातात दिले. तेव्हापासून महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला आहे. हा वणवा आता थांबणारा नाही.

यावेळी खा. राऊत यांनी बजरंग पाटील यांना आता भगवा हातात घ्या म्हणत ‘बजरंग पाटील की जय’ असे सुचक वक्तव्य केल्याने शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राऊत म्हणाले

  • ‘भाजपच्या झुंडशाहीला गुंडशाहीने उत्तर देऊ
  • पन्नास खोके एकदम ओके ही लोकांची घोषणा
  • शिवसेने सामान्य माणसाला मंत्री, मुख्यमंत्री केले
  • कोल्हापुरातील साडेतीन दीड शहाण्यांनी निवडूण येऊन दाखवावे
  • ‘ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सांगलीने वाटा उचलावा लागेल
  • मी सांगलीला पुन्हा- पुन्हा येईन मात्र फडणवीसांप्रमाणे नाही
  •  शिवसेनेला वसंतदादा, क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पाठिंबा होता
  • ‘आमचा प्राण गेला तरी मुंबई वेगळी होऊ दिली जाणार नाही
  • जनभावना मुख्यमंत्र्या विरोधातच
  • भारताचा भू-भाग चीनने बळकावला त्यावर मोदी-शहा का बोलत नाहीत?

Back to top button