सांगली : बसस्थानक नूतनीकरणाचे ६१ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित | पुढारी

सांगली : बसस्थानक नूतनीकरणाचे ६१ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित

सांगली; शशिकांत शिंदे : सामान्यांच्याद़ृष्टीने महत्त्वाची असलेली एसटी आणि जिल्ह्यातील बहुतेक बस स्थानकांची मोठी दुरवस्था झाली आहे. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी प्रशासनाने जिल्ह्यातील बस स्थानकाचे दुरुस्ती, नूतनीकरण आणि अद्ययावत करण्यासाठी सुमारे 61 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे दिला आहे; मात्र याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.

गेल्या काही वर्षांत दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खासगी प्रवासी वाहतूक वाढत आहे. तरीसुद्धा खेड्यात, इतरत्र जाण्यासाठी सर्वसामान्यांच्याद़ृष्टीने एसटी महत्त्वाची आहे. मात्र, एसटीकडे सरकारचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. त्यातच कर्मचार्‍यांनी केलेल्या बेमुदत बंदचा फटका एसटीला बसला. प्रवासी कमी झाले. त्यातून एसटीला सावरण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

सांगलीतील सध्याचे बसस्थानक व आगार 1965 मध्ये बांधण्यात आले आहे. वाढती प्रवासी संख्या व अपुरी जागा यामुळे या बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे.

सांगलीसह इस्लामपूर, मिरज, विटा, आटपाडी, कवठेमंकाळ, खानापूर, जत येथील बसस्थानकांची बिकट स्थिती आहे. बसस्थानकामध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. खडी विस्कटलेली आहे. एसटी प्रशासनाने सांगलीसह जिल्ह्यातील, मिरज, विटा, आटपाडी, कवठेमंकाळ, खानापूर, जत, इस्लामपूर या बसस्थानक परिसराची दुरुस्ती करण्यात यावी, नूतनीकरण करण्यात यावे यासाठी सुमारे 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव त्या त्या तालुक्यातील संबंधित स्थानिक आमदार यांच्याकडे दिला आहे. त्याशिवाय मिरज शहर आणि ग्रामीण ही दोन्ही बसस्थानके सुसज्ज करण्यासाठी 37 कोटी रुपयांचा प्रस्ताव पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

प्रवाशांची संख्या घटू लागली

जिल्ह्यात बहुतेक बसस्थानकांची दुरवस्था आहे. अनेक गाड्या जुन्या झालेल्या आहेत. त्याची दुरुस्ती सतत निघत आहे. त्या कमी वेगाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. याचा उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे. एसटी अडचणीत आल्यास सामान्यांना प्रवास करणे अवघड होणार आहे.

Back to top button