Vehicle Theft : जतमधील पिकअप चोरास अकलूज मधून अटक; एक दिवसाची पोलीस कोठडी | पुढारी

Vehicle Theft : जतमधील पिकअप चोरास अकलूज मधून अटक; एक दिवसाची पोलीस कोठडी

जत; पुढारी वृत्तसेवा : अंकले (ता.जत) येथे घरासमोर उभी असलेली पिकअप बनावट चावी वापरुन पळवून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पिकअप चोरून नेलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास चार महिन्यानंतर पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी सिताराम लक्ष्मण येडगे (वय ३०, रा. पाणीव ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आप्पासो शामराव एडके (रा. अंकले) यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात २९ ऑक्टोबर २०२२ रोजी जत पोलिसात पिकअप चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. (Vehicle Theft)

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकले येथे आप्पासो एडके यांनी त्यांच्या घरासमोर पिकअप उभे केले  होते. २९ ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने हे पिकअप पळवून नेल्याची घटना घडली. ३० ऑक्टोबर रोजी या घटनेबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. पोलीस नाईक लक्ष्मण बंडगर, आगतराव मासाळ यांना चोरीस गेलेले हे पिकअप अकलूज येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनुसार पोलिसांनी तपास गतिमान करत अकलूज येथून आरोपी सिताराम येडगे याच्यासह चोरीस गेलेली पिकअप (क्र. एम. एच. ०४ जीसी २८३५) ताब्यात घेतले आहे.

याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलीस नाईक लक्ष्मण बंडगर, पोलीस नाईक सचिन हाक्के, पोलीस नाईक आगतराव मासाळ, गणेश ओलेकर ,शिवानंद चौगुले, विशाल बिले ,प्रशांत खोत यांनी कारवाई केली आहे . जत तालुक्यात वाहने चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे यापूर्वी शेगाव येथून ट्रॅक्टर, अंकलेतून पिकअप, दोन दिवसांपूर्वी जत शहरातून उभा केलेला ट्रक पळवून नेला होता. परंतु पोलिसांनी एका दिवसातच या प्रकरणाचा छडा लावला. शहरासह तालुक्यातून मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

हेही वाचा

Back to top button