सांगली : बांधावरची झाडं संपली… | पुढारी

सांगली : बांधावरची झाडं संपली...

सांगली; नंदू गुरव : शेती म्हणजे नुसतीच रानातली पिकं नाहीत तर शेतीत बांधावरची झाडीसुद्धा असतात. हे ज्याला समजलं त्याची शेती फायद्याची झाली. बदलत्या शेतीत हे सूत्र मात्र बदलले आणि बांधावरच्या झाडांवर पहिली कुर्‍हाड बसली. ही झाडं तोडल्यामुळं पक्ष्यांचा आसरा तर गेलाच; पण शेतीसोबत फायदा देणारा, निसर्ग जपणारा एक पर्यायही कायमचा थांबला.

शेताचे बांध चिंच, बकान, बाभूळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसू, सुबाभूळ, पिंपळ, एरंड, चिल्लार, मेंदी, विलायती बाभूळ, करंज, पळस, सीताफळ यासारख्या झाडांनी भरलेले असायचे. आता यातली बाभळ तर बघायलाही मिळत नाही. रानात काटे कशाला आणि बाभळीचं करायचं काय असं म्हणून बाभळी तोडल्या गेल्या. आता रानात कुठंतरी एकादी चुकून राहिलेली बाभळ दिसते.

बाभळीच्या झाडांचे उंबरे प्रत्येक घराला वापरले जात होते. आता घराला उंबरठेच राहिले नाहीत तर बाभळ काय कामाची? जळणासाठी ती तोडली गेली आणि बांधावरच्या बाभळीची संख्या झपाट्याने कमी होत गेली. एकतर बाभळी आणि बोरीला मुद्दाम लावावे लागत नाही. ही काटेरी झाडं कुठंही माळरानावर येतात. पाणी पाजायचा, राखत बसायचा प्रश्न नाही. लिंब, करंज, पळसही असेच. न खर्चाचे.

बांधावरची ही काटेरी झाडे गेली आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम पक्ष्यांवर झाला. कोल्हा, ससा, खोकड यासारख्या प्राण्यांचे वसतिस्थान काटेरी झुडपांजवळच असते. पक्षी, सुगरण आपलं घरटं बोरी, बाभळीसारख्या काटेरी झाडावरच बांधतात. कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या यांची घरटी पण बाभळीवरच दिसतात. खारुटीचं घरटं बाभळीच्या झाडावरच असते. शेतीच्या बांधावरची स्थानिक जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. झाडाच्या सावलीत पिके वाढत नाहीत या समजूतीनेही ती तोडण्यात आली. पण हा गैरसमज आहे. देशी स्थानिक झाडांच्या सावलीतही पिके वाढतात. पण त्याजागी गुलमोहर, निलगिरी, उंदिरमारी अशी चुकीची झाडे लावली तर पिके वाढणार नाहीतच.

बोरी बाभळीची नर्सरी

तासगाव तालुक्यातील लोढे गावचे कदम बोरी बाभळीसारख्या बांधावर लावण्यात येणार्‍या झाडांची नर्सरीही तयार करणार आहेत. वन विभागामध्येही अशी झाडे उपलब्ध आहेत.

बांधावरची झाडे

अंजन, कचनार, चिंच, बकान, बाभूळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसव, सुबाभूळ, पिंपळ, एरंड, ग्लिरीसीडीया, चिल्लार, मेंदी, विलायती बाभूळ अशी बांधावरची झाडे आहेत.

Back to top button