सांगली : 184 गावांत, 861 वाड्यांवर टंचाईचे सावट | पुढारी

सांगली : 184 गावांत, 861 वाड्यांवर टंचाईचे सावट

सांगली; पुढारी वृत्तसेवा :   जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्या अखेरीसच उन्हाचा कडाका वाढला आहे. परिणामी, विहिरी, कूपनलिकेतील पाणी कमी होत आहे. भूगर्भातील पाणी पातळीही कमी होवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी संकट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मार्च ते जूनपर्यंत काही गावांतील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांबरोबरच जनावरांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या वर्षीचा टंचाई आराखडा विचारात घेऊन तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या मदतीने टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

102 गावांत, 415 वाड्या-वस्त्यांवरील विहिरी अधिग्रहण

जिल्ह्यात मार्चअखेरीस खानापूर तालुक्यातील तीन गावे आणि एका वाडीवरील आणि शिराळा तालुक्यातील सहा गावांत व दोन वाडीत अशा 9 गावांत आणि 3 वाड्या- वस्त्यांवर खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत 93 गावांत 412 वाड्या-वस्त्यांवरील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील 10 गावांचा व 11 वस्त्यांचा समावेश आहे. जत तालुक्यातील 40 गावे, 285 वाड्या, कडेगाव तालुक्यातील 3 गावे आणि 1 वाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील 16 वाड्या, खानापूर तालुक्यातील 16 गावे व 1 वाडी, मिरज तालुक्यातील 12 गावे आणि 96 वाड्या, शिराळा तालुक्यातील 6 गावे 2 वाड्या, तासगाव तालुक्यातील एक गाव आणि वाळवा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे.

16 गावांत विंधन विहिरींचे प्रस्ताव

जत, शिराळा तालुक्यातील 16 गावांत आणि 22 वाड्या-वस्त्यांवर नवीन विंधन विहीर घेण्यात येणार आहे. यासाठी 25 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गेली तीन वर्षे मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या वर्षी दहा तालुक्यांत सुमारे 8 हजार मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. परिणामी, बहुसंख्य तलाव-बंधारे तुडुंब भरले. मात्र, पावसाच्या पाण्याची अनेक भागात साठवणूक झाली नाही. त्यामुळे मार्च, एप्रिलमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दर वर्षीचाच टंचाईचा प्रश्न लोकप्रतिनिधी का निकालात काढत नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.

66 गावांत, 424 वाड्या-वस्त्यांना टँकरची गरज

जिल्ह्यात मार्च महिन्याअखेरपर्यंत शिराळा तालुक्यातील 4 गावांत आणि 8 वाड्या-वस्त्यांवर एकूण 12 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी 4 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत जत तालुक्यातील 40 गावांत आणि 285 वाड्यां-वस्त्यांवर टँकरची आवश्यता भासू शकते. तसेच मिरज तालुक्यातील 12 गावांत, 96 वाड्यांत, शिराळा तालुक्यातील 4 गावे आणि 8 वस्त्यांवर, तासगाव तालुक्यात 4 गावांत व 11 वाड्यांत, असे एकूण 62 गावांत आणि 416 वाड्यां-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते. जिल्ह्यात जूनपर्यंत एकूण 66 गावांत आणि 424 वाड्यां-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 2018-19 मध्ये 111 गावांत सुरू होते टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात 2018-2019 मध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा नागरिकांबरोबरच जनावरांनाही बसल्या होत्या. आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज, तालुक्यांतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी 111 ठिकाणी सुमारे 4 लाख 23 हजार 938 लोकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. गावागावांत दिवस-रात्र टँकरच्या फेर्‍या सुरू होत्या. 2019-20 मध्ये 69 गावांत टँकरने पाणी दिले जात होते. 2020-21 मध्ये 6 गावांत, 21-22 मध्ये 7 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. यंदा 66 गावांत, 424 वाड्यां-वस्त्यांवर टँकरची गरज लागण्याची शक्यता आहे.

Back to top button