

विटा; पुढारी वृत्तसेवा : शेतीपंपांची वीज तोडणी थांबली नाही तर वीज कार्यालये पेटवून देणार असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
विटा – सांगली रस्त्यावर मंगरूळ फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २२) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, तानाजी धनवडे, अमित रावताळे, दामाजी डूबल आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, ५० हजार प्रोसाहन अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा, द्राक्षाला हमी भाव जाहीर करा, दिवसा शेतीला वीज द्या, ऊस तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा आदीसह अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी "शिंदे सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय" आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. या आंदोलनादरम्यान दुतर्फा वाहनांची रांगच रांग लागली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी महेश खराडे म्हणाले, सध्या उन्हाळा आहे त्यामुळे शेतीला पाण्याची गरज असते. मात्र महावितरण कंपनी ने वीज कनेक्शन तोडणी मोहीम जोरात सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे ही मोहीम तातडीने बंद करावी दहा वर्षे बिल न देता अचानक तोडणी मोहीम कोणत्या कायद्यात बसते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही मोहीम थांबली नाही तर वीज कार्यालये पेटवून देवू असा इशारा त्यांनी दिला. तीन वर्षे घोषणा होवूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत, काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले मात्र ६० ते ७० टक्के शेतकरी वंचित आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नियमित कर्जदारांना ५० हजार अनुदान तातडीने मिळाले पाहिजेत. अन्यथा राज्य सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत खराडे म्हणाले.
द्राक्षाचे दर ही घसरले आहेत, त्यामुळे द्राक्ष शेती परवडेनासे झाली आहे. द्राक्ष शेती वाचविण्यासाठी द्राक्ष बेदाण्याला हमीभाव जाहीर करावा. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे, कारखाने तोडणीचे पैसे बिलातून कपात करतात. ही लूट थांबविण्यासाठी मुकादमांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या आंदोलनावेळी निशिकांत पोतदार, दत्ता जाधव, अनिल पाटील, प्रताप शिंदे, सिकंदर शिकलगार, चंद्रकांत पाटील, सुभाष पाटील, नामदेव लोखंडे, उत्तम चंदनशिवे, महादेव पवार धोंडीराम पाटील, पंढरीनाथ जाधव, निलेश जाधव, बाबासो शिंदे, प्रतीक पाटील, विजय रेंदलकर, संदीप शिरोते, हणमंत पाटील विठ्ठल जाधव, दीपक पाटील, किशोर पार्लेकर आदी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.