जत मधील कृषी प्रक्षेत्र बनले भकास; उपविभागीय कृषी विभागाचे दुर्लक्ष

कृषी प्रक्षेत्र बनले भकास
कृषी प्रक्षेत्र बनले भकास
Published on
Updated on

जत ; विजय रूपनूर कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान अवगत करणे प्रात्यक्षिक तत्त्वावर सुधारित वाणाचा वापर करून फळे, फुले, पिके यासह अनेक पिकांची लागवड करणे. उत्पादित शेती मालाचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक सादर करून त्यांना प्रोत्साहित करणे. कृषी विद्यापीठाने नव्याने विकसित केलेले वाणाचे प्रायोगिक तत्त्वावर लागवड करून शेतकऱ्यांना दाखवणे. यासह अनेक हेतूने कृषी विभागाने चाळीस एकरावर अधिक क्षेत्र कृषी प्रक्षेत्र म्हणून निवड केली आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले जात होते. ते शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत होते, परंतु आज हेच ठिकाण प्रेमी युगलांचा अड्डा, तळीराम व जुगार खेळणाऱ्या लोकांचा अड्डा बनला आहे.

जत तालुक्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत, परंतु याचा आदर्श कृषी विभागाने घेणे गरजेचे असताना ४० एकर कृषी विभागाची जमीन विना वापर पडून आहे. सद्यस्थितीत या जमिनीत घाणीचे साम्राज्य, काटेरी झुडपे, मोकाट जनावरे यांचा उच्छाद, सापांचा सुळसुळाट, निर्मनुष्य ठिकाण यामुळे बाजूस असणाऱ्या विठ्ठल नगर व विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गा लगत असणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. परिणामी उपविभागीय कृषी विभाग एवढे सुस्त का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान माडग्याळ मध्ये याच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एका शेतकऱ्याने एकरी तब्बल ४३ क्विंटल बाजरीचे विक्रमी उत्पादन घेतल्याचा डोंगरा पिटवला गेला. हा दावा फोल गेला आहे. याबाबत नुकतेच कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने यासंबंधीचे प्रात्यक्षिक व माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्याने खळबळ उडाली आहे. या उत्पादनाबाबत केलेला दावा या विषयी कृषी विभागाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

कृषी विभागासमोर आव्हान

जत तालुका आवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात सर्वदूर पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते. म्हणून भविष्यात अल्प पाण्यात येणाऱ्या पिकांचे वाण शोधणे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ होत आहे. वातावरणातील बदलांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अवेळी, अती, कमी पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. शेती उत्पादनावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत. पावसाचा लहरीपणा यामुळे भूपृष्ठावर पाणी साठवण करणे गरजेचे आहे. या तुलनेत आपल्या जिल्ह्यात देखील असे प्रयत्न होणे नितांत गरजेचे आहे. शेततलाव, विहीर पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत प्रयोग या कृषी प्रक्षेत्रावर होणे आवश्यक आहे, मात्र तसे प्रयोग होत नाहीत.

तर स्वतः सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण

जत तालुका जिल्ह्यात विस्ताराने मोठा आहे. एकूण दोन लाख २४ हजार ५३८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असून, पारंपारिक व्यवसाय न करता त्यांना तंत्रज्ञानयुक्त शेतीचे मार्गदर्शन नवनवीन प्रयोग, माहिती कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर देणे आवश्यक आहे. असे असताना या विभागाची अवस्था कृषी प्रक्षेत्रावरून स्वतः सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी प्रचिती येत आहे.

एक दृष्टिक्षेप 

जत तालुक्यात १२३ गावांचा समावेश
एकूण क्षेत्र ;२२ लाख ५८ हजार ८२८ हेक्टर
लागवडी लायक क्षेत्र;१ लाख ८० हजार ३०४
एकूण खातेदार; १ लाख १८ हजार ५७९ हजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news