सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बनावट सोने गहाण ठेवून तेरा लाखाची फसवणूक | पुढारी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बनावट सोने गहाण ठेवून तेरा लाखाची फसवणूक

जत; पुढारी वृत्तसेवा : माडग्याळ (ता.जत ) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट सोने गहाण ठेवून १३ लाख २१ हजार तारण कर्ज उचलल्याची गंभीर बाब जिल्हा बँकेच्या निदर्शनास आली आहे. याबाबत सात कर्जदारासह व खोटे मूल्यांकन करणाऱ्या सराफासह उमदी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद बँकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

याप्रकरणी श्रीकांत गोविंद हुवाळे (रा.व्हसपेठ )दिलीप सुखदेव सावंत (रा.माडग्याळ ), मच्छिंद्रनाथ शाहू सावंत (माडग्याळ), शहाजी मारुती तुराई (रा.राजोबाचीवाडी) धुडाप्पा भीमराव गावडे (रा. सोरडी), अंकुश रामू घोदे (रा.व्हसपेठ) सिद्धू रतन शिंदे (रा.राजोबाचीवाडी) व मूल्यांकन करणारे सुवर्णकार संजय विठ्ठल सावंत (रा.माडग्याळ)असे आठ जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे .

याबाबत अधिक माहिती अशी, माडग्याळ येथील जिल्हा मध्यवर्तीच्या शाखेत सराफ (व्हॅल्युशन) मूल्यांकन करण्याकरिता संजय विठ्ठल सावंत या सुवर्णकाराची नेमणूक केली होती. त्यांनी बँकेकडे सोने तारण साठी आलेल्या सात जणांचे बनावट असलेले सोने चोख सोने असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे बँकेने त्यांना ७ जणांना १३ लाख २१ हजाराची कर्जाऊ रक्कम तारण कर्ज म्हणून दिले आहे. याबाबत जिल्हा बँकेने सोने जिन्नस क्रॉस पडताळणी करिता श्रीशैल विठ्ठल आरगोडी यांची नेमणूक केली आहे. यावेळी सदरचे ९ जिन्नस बनावट असल्याचे दिसून आले. याबाबतचा पत्रव्यवहार जिल्हा बँकेचे सर -व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आला यावेळी सर्व व्यवस्थापक यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार सोने तारण कर्जदार कंसात फसवणूक केलेली रक्कम श्रीकांत गोविंद हुवाळे (८५०००), दिलीप सुखदेव सावंत (१६००००), मच्छिंद्रनाथ शाहू सावंत (१५०,०००), शहाजी मारुती तुराई (५६५०००) धुडाप्पा भीमराव गावडे (१५१०००), अंकुश रामू घोदे (६००००) सिद्धू रतन शिंदे (१५००००) असे एकूण पंधरा लाख हुन अधिक रकमेचे सोने गहाण ठेवले आहे त्याचे सरासरी ८० टक्के प्रमाणे १३ लाख २१ हजार करून त्यांना कर्ज दिले आहे सदरची फसवणूक सराफ व कर्जदार यांनी केल्याचे लक्षात आले . याबाबतची फिर्याद बँकेचे तालुका विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी उमदी पोलिसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत

Back to top button