सांगली : दुचाकी घसरून तरुणीचा मृत्यू

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर- जुनेखेड रस्त्यावरील बोरगाव येथे शिंदे मळ्यानजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पूजा विलास वडार (वय २३, रा. तहसील कचेरी रोड, इस्लामपूर) या तरुणीचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली.
पूजा ही दुचाकी (एम. एच. १२ / डीसी – ५९१) वरून जुनेखेड येथे दुपारी गेली होती. जुनेखेडवरून घरी परतताना बोरगाव शिंदे मळ्याजवळ पूजाची दुचाकी घसरली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पूजाचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. सदरचा मृत्यू अपघात नसून घातपात आहे, असा आरोप त्यांनी केला.