सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू

सांगली : चारचाकीच्या धडकेत अंत्यविधीसाठी चाललेल्या ३ महिलांचा मृत्यू

रामनगर : पुढारी वृत्तसेवा :  नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी चालत जाणाऱ्या तीन महिलांना मागच्या बाजूने चारचाकीने उडवल्याने तिघींचाही मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. सायंकाळी ५ च्या सुमारास रामनगरजवळ धारवाड-गोवा मार्गावार हा अपघात घडला. चारचाकी मूळची तामिळनाडूची असून, त्यातून एक कुटुंब सहलीसाठी तमिळनाडूहून गोव्याकडे जात होते. सायंकाळच्या वेळी डोळ्यांवर सूर्यकिरणे पडल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

कल्पना कुमान्ना गावडे (वय ४४), पार्वती चुडाप्पा गावडा (६०),पार्वती भुजंग फोंडशेकर (६६) अशी मृतांची नावे असून, त्या तिघाही खानापूर तालुक्यातील घार्ली गावच्या आहेत. विपिन तिळवे (रा. रामनगर) असे जखमीचे नाव आहे. जखमीवर रामनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार : खानापूर तालुक्यातील घार्ली गावातील महिला जवळच असणाऱ्या गवेगाळी गावातील एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होत्या. घार्ली गावातून त्या क्रुझरने रामनगरपर्यंत आल्या. तेथून पुढे त्या धारवाड – गोवा महामार्गावरून चालत जात होत्या. त्याचेवळी तामिळनाडू येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर रामनगरमध्ये पिग्मी कलेक्टरचे काम करणारे तिळवे हेही जखमी झाले.

गोव्याकडे जात असतना मावळतीच्या सूर्याची किरणे चारचाकी वाहनाच्या काचेतून डोळ्यांवर पडल्याने समोरचे काहीच दिसले नाही, असे कारण चारचाकी वाहनचालकाने पोलिसांना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news