सांगलीत १२ किलो गांजा जप्त; तिघांना अटक | पुढारी

सांगलीत १२ किलो गांजा जप्त; तिघांना अटक

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील कोल्हापूर रस्त्यावरील झुलेलाल मंदिर चौक परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुरुवारी दुपारी यश आले. त्यांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारास कुमठेफाटा (ता. तासगाव) येथून अटक केली. त्याच्याकडून १२ किलो गांजा व तीन मोबाईल असा एकूण दोन लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये धनंजय शैलेश भोसले (वय ३५, रा. दत्त कॉलनी, शामरावनगर सांगली), तुषार महेश भिसे (वय १९, रा. हरिपूर रोड, काळीवाट, सांगली) आणि गणेश भाऊ साळुंखे (वय २६, रा. कोळे, ता. सांगोला ) यांचा समावेश आहे.

भोसले याला काही महिन्यापूर्वी तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. झुलेलाल मंदिर चौकातील सिंधू सांस्कृतिक भवन नजिक दोघे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावला. पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस असल्याची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडले.

दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत गांजा असल्याचे आढळले. संशयित धनंजय भोसले याच्याकडून ५६ हजार १०० रुपयांचा ३ किलो ७४० ग्रॅम व तुषार भिसे याच्याकडून ६२ हजार ४४५ रुपयांचा ४ किलो १६३ ग्रॅमचा गांजा जप्त केला. तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. हा गांजा कोठून आणला, याबद्दल दोघांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी हा गांजा सांगोला येथील त्यांचा साथीदार गणेश साळुंखे याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. साळुंखे हा तासगाव रस्त्यावरील कुमठेफाटा येथे थांबला असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी तातडीने कुमठेफाटा येथे धाव घेऊन तेथून संशयित साळुंखे यास अटक केली.

जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हवलदार सागर लवटे, संतोष गळवे, दिलीप जाधव, विक्रम खोत, बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Back to top button