सांगलीत सात लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

सांगलीत सात लाखांचा ऐवज लंपास

सांगली; पुढारी वृत्तसेवा : विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेमिनाथनगर येथील राजेसाहेब मुरलीधर लोंढेकर (वय 49) यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व दीड लाखांची रोकड असा एकूण सात लाखांचा ऐवज लंपास केला. 13 जानेवारीरोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

लोंढेकर यांचे लातूर जिल्ह्यातील निवळी हे गाव आहे. नोकरीनिमित्त ते सांगलीत राहतात. त्यांनी नेमिनाथनगरमध्ये फ्लॅट घेतला होता. 13 जानेवारीरोजी ते नोकरीवरून घरी आले. सायंकाळी साडेपाच वाजता ते कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचाची कडी व कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूमध्ये जाऊन कपाटाचा लॉक तोडला. त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील साडेपाच लाख रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.

रात्री लोंढेकर कुटुंब बाहेरून घरी परतले. दरवाजाचा लॉक तुटल्याचे पाहून लोंढेकर यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी विश्रामबाग पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान फ्लॅटपासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. घरातील सोन्याचे दागिने व रोकडची मोजदाद करून शनिवारी लोंढेकर यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भेट दिली.

स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. नेमिनाथनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. तेथील काही लोकांकडे चौकशी केली जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये दोन किंवा तीन चोरट्यांचा हात असण्याची शक्यता आहे. केवळ चार तासच लोंढेकर कुटंब घरी नव्हते. त्या काळात चोरी झाल्याने स्थानिक गुन्हेगारांकडे संशयितांची सुई फिरत आहे. अत्यंत गजबलेल्या भागात चोरट्यांनी ही चोरी करून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. पोलिसांनीही या भागात गस्त वाढविली आहे.

Back to top button