सांगली : भरतीच्या आशेवरील तरुणांच्या फसवणुकीची शक्यता | पुढारी

सांगली : भरतीच्या आशेवरील तरुणांच्या फसवणुकीची शक्यता

सांगली; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षात कर्मचारी भरतीची घोषणा महापालिकेने केलेली आहे. या घोषणेचे संधीत रुपांतर करण्यासाठी काही मंडळी सरसावली असल्याचे दिसत आहे. भरती इच्छुक तरुणांभोवती काहींनी जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भरतीच्या आशेवर असलेल्या काही तरुणांच्या फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेकडील अधिकारी, कर्मचार्‍यांची मंजूर पदे 2 हजार 378 आहेत. नवीन सुधारित आकृतीबंधानुसार त्यात आणखी 2 हजार 467 पदांची भर पडणार आहे. हा सुधारित आकृतीबंध आणि सेवानियमावलीचा प्रस्ताव मंजुरीचा प्रतीक्षेत आहेत. एक-दोन दिवसात त्यास शासन मंजुरी मिळेल असे नुकतेच महापालिकेत झालेल्या एका कार्यक्रमात सांगण्यात आले होते. त्यामुळे भरतीचे वारे वाहू लागले आहेत. तो अंदाज ओळखून काही व्यक्तींनी दुकानदारी सुरू केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. भरतीवेळी लक्ष असू द्या, असे काही व्यक्ती काही अधिकार्‍यांना सांगत असल्याची चर्चा आहे.

महापालिकेत वशिला असल्याची बतावणी करून काहीजणांकडून भरती इच्छुकांभोवती जाळे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया किती पारदर्शीपणे होणार आहे तसेच भरतीबाबत शासन निर्देश काय आहेत, याची माहिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

मानधनी, कंत्राटी भरती करण्याची पद्धत आणि महापालिकेची ही प्रस्तावित भरती यामध्ये नेमका फरकही प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.

किती पदांच्या भरतीसाठी मिळणार मान्यता !

महापालिकेत अधिकारी, कर्मचारी रिक्त पदांची संख्या मोठी आहे. निवृत्तीद्वारे रिक्त पदांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे आकृतीबंध मंजुरीनंतर भरती होणार हे स्पष्ट आहे. पण मुळातच महापालिकेचा प्रशासकीय खर्च जास्त आहे. त्या तुलनेत उत्पन्न कमी आहे. शासनाकडून किती आणि कोणत्या पदांच्या भरतीसाठी मंजुरी मिळणार हेही महत्वाचे आहे. हे सर्व स्पष्ट होण्यापूर्वीच काहींच्या हालचाली सुरू झाल्याने दुकानदारीची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

Back to top button