सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व | पुढारी

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व

नागज/देशिंग; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पंधरा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सात ग्रामपंचायतीवर विजय मिळवला तर भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला अवघ्या तीन ग्रामपंचायती जिंकता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आघाडीने शिरढोण व अलकूड-एम ग्रामपंचायत जिंकली तर केरेवाडीमध्ये स्वतंत्र विचाराचे सरपंच निवडणूक आले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी 80 आणि सदस्यपदासाठी 620 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. मंगळवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला निकाल नागज ग्रामपंचायतीचा लागला. माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक तानाजी शिंदे हे सरपंचपदासाठी विजयी झाले. शिंदे यांनी भाजपचे सदाशिव शेटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर पाटील यांचा पराभव केला.

कुची ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहदेव सुखदेव गुरव विजयी झाले. त्यांनी घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार पाटील यांच्या गटाला चितपट केले. आगळगांवमध्ये राष्ट्रवादीचे दत्ताजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 11 पैकी 10 जागा जिंकल्या. सरपंच पदाच्या उमेदवार उषा प्रमोद रास्ते या विजयी झाल्या.

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या घाटनांद्रे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 9 पैकी 8 जागा जिंकल्या तर सरपंचपदी अमर शिंदे हे मोठ्या मताने विजयी झाले. त्यांनी भाजपचे दिलीप विश्वास शिंदे यांचा पराभव केला.

जाखापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप समर्थक तानाजी पाटील यांच्या आघाडीने भाजपच्याच पॅनेलचा पराभव केला. येथे राष्ट्रवादीच्या सिंधुताई गोरख सुतार या सरपंचपदी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या सुनीता चव्हाण यांचा पराभव केला.

लंगरपेठ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे महेश पवार यांनी आपली सत्ता कायम ठेवली. राष्ट्रवादीच्या अंजना महादेव कांबळे या विजयी झाल्या.

अलकूड-एसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि घोरपडे गट असा सामना होऊन या लढतीत राष्ट्रवादीचे दादासाहेब पाटील हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीच्याच सूरज चौगुले आणि गोरख कांबळे यांचा पराभव केला .

रांजणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निलम संतोष पवार या सरपंचपदी निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या प्रज्ञा उदय भोसले व मनसेच्या अश्विनी किशोर पाटील यांचा पराभव केला.

लोणारवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित खोत यांनी भाजपचे शीतल खोत व अपक्ष नरेंद्र मोरे यांचा पराभव केला. येथे भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. विठुरायाचीवाडीमध्ये राष्ट्रवादीचे अर्जुन गेंड यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने ऐतिहासिक विजय खेचून आणला. त्यांनी राष्ट्रवादीचेच मोहन खोत यांच्या गटाला सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला. चैतन्य शिवाजी चव्हाण हे विजयी झाले.

हिंगणगावमध्ये राष्ट्रवादीच्या प्रिया राहुल सावळे या विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष आशाराणी लोंढे यांचा पराभव केला.

शिंदेवाडी-एच ग्रामपंचायतीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले. सरपंच पदाच्या उमेदवार सुरेखा कुनुरे यांनी घोरपडे गटाच्या स्वाती मिरजे व दीपाली बोदगिरे यांचा पराभव केला .

शेळकेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता दत्तात्रय साळुंखे यांनी भाजपच्या अश्विनी जगताप यांचा पराभव केला. कुकटोळीत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे उमेदवार तानाजी यमगर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत हजारे यांचा पराभव केला.

खरशिंग ग्रामपंचायतीच्या तिरंगी निवडणुकीत खासदार पाटील व माजी मंत्री जयंत पाटील आघाडीचे सुहास पाटील यांनी राष्ट्रवादी व माजी मंत्री घोरपडे गटाचा धुव्वा उडवून सत्ता कायम राखली. या गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार वत्सला शिवाजी पाटील या विजयी झाल्या.

बोरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार स्मिता नामदेव पाटील या विजयी झाल्या.

आरेवाडीत खासदार संजय पाटील समर्थक सुशीला बापू कोळेकर या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता कोळेकर यांचा पराभव केला.

कोंगनोळीत माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक भूपाल पाटील हे विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील यांचा पराभव केला. सराटीमध्ये अजितराव घोरपडे समर्थक विजय पवार हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे शशिकांत लेंडवे यांचा पराभव केला.

शिरढोणमध्ये राष्ट्रवादी व भाजप आघाडीच्या उमेदवार शारदा पाटील या विजयी झाल्या. त्यांनी घोरपडे गट व राष्ट्रवादीच्या जयश्री महेंद्र पाटील यांचा पराभव केला.

केरेवाडी यथे सरपंच पदाचे स्वतंत्र विचाराचे उमेदवार श्रीकृष्ण पाटील विजयी झाले.

ढालेवाडीत राष्ट्रवादी व घोरपडे गट आणि खासदार पाटील समर्थक या एकत्रित पॅनेल विरुद्ध पॅनेल लावले होते. राष्ट्रवादीच्या तेजस्विनी साळुंखे या विजयी झाल्या.

अलकूड-एम मध्ये राष्ट्रवादी व भाजप आघाडीने राष्ट्रवादीचा पराभव केला. राष्ट्रवादीचे बापूसाहेब तंगडी हे विजयी झाले. हरोलीत राष्ट्रवादीच्या रेश्मा पाटील या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

Back to top button