सांगली : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीत वाळवा तालुक्यात आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. 88 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आहे. तर ज्या गावांमधून भाजप व विरोधी आघाड्या संघटित झाल्या अशा ठिकाणी राष्ट्रवादीला हादरे बसत सत्तांतर झाले आहे. ताकारी, कुरळप, पेठ, वाटेगाव, कोरेगाव, कि.म.गड, अहिरवाडी, गोटखिंडी, ढवळी येथे धक्कादायक निकाल लागत सत्तांतर घडले. राष्ट्रवादीला ताकारी, कुरळप, कि.म. गड या ठिकाणी जबर धक्के बसले.

ताकारी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून महानंदाचे माजी अध्यक्ष विनायक पाटील यांच्या पत्नी पराभूत झाल्या. भाजप व विरोधी आघाडीची येथे सत्ता आली आहे. राज्य साखर संघाचे नूतन अध्यक्ष पी.आर. पाटील यांची वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या कुरळपमध्येही सत्तांतर होऊन पी.आर. पाटील यांच्या गटाला हादरा बसला. पेठ ग्रामपंचायतीतही सत्तांतर झाले असून राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. हा महाडिक गटाला धक्का मानला जात आहे. किल्लेमच्छिंद्रगड येथे राष्ट्रवादीची सत्ता जावून भाजप आघाडीची सत्ता आली आहे. कामेरी येथे जि.प. चे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील विजयी झाले आहेत. कासेगावात राष्ट्रवादीने कासेगाव व साखराळेत आपले वर्चस्व कायम राखत सर्व जागा जिंकल्या. वाटेगावात पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र बर्डे यांच्या गटाला धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाची व विरोधक आघाडीची सत्ता आली आहे. येडेनिपाणीत काँग्रेस-राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता आली आहे. बोरगावात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील सरपंच पदासाठी मोठ्या मतांनी विजयी झाले असले तरी बहुमत मात्र राष्ट्रवादीला मिळाले. चिकुर्डेत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यांचे बंधू रणजित पाटील विजयी झाले असून सर्व जागाही जिंकल्या. ऐतवडे खुर्दमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने आपली सत्ता कायम राखली आहे. बहे ग्रामपंचायतीत सत्ताधारी विठ्ठल पाटील गटाची सत्ता जावून विरोधी आघाडीने बाजी मारली आहे.

भाजपचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक व निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही अनेक गावात मुसंडी मारली. त्याचबरोबर मरळनाथपूरला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची सत्ता आली. भाजप व विरोधकांच्या आघाडीला मिरजवाडी, कि.म. गड, नरसिंहपूर, जांभुळवाडी, ताकारी, येडेमच्छिंद्र, लवंडमाची, रेठरेहरणाक्ष, बिचुद, ठाणापुडे, जुनेखेड, हुबालवाडी, कुंडलवाडी, नागाव, फाळकेवाडी, बहादूरवाडी येथे सत्ता मिळाली. वाळव्यात सत्ताधारी हुतात्मा गटाकडे सरपंचपद तर बहुमत मात्र राष्ट्रवादीने मिळविले.

रटाळवाडी मतमोजणी तब्बल 10 तास…

जिल्ह्यात सर्वात जास्त 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका वाळवा तालुक्यात होत्या. मात्र येथे पोस्टल मतदानाची संख्या जास्त असल्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत रटाळपणे सुरू होती. 10.40 मिनिटांनी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 15 पैकी केवळ सहाच फेर्‍या पूर्ण झाल्या होत्या. मतमोजणी केंद्रात मतमोजणी झाल्यानंतर उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतांची बेरीज करण्यासाठीही थांबून दिले जात नव्हते. त्यामुळे नेमका विजय कोणाचा झाला, याबाबत प्रतिनिधीच संभ्रमात होते. शिवाय प्रशासनाकडूनही फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येत नव्हता. त्यामुळे तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. अनेक गावांनी फेर मतमोजणीचीही मागणी केली होती.

असेही लक्षवेधी निकाल!

तालुक्यातील कोरेगावमध्ये सत्तांतर घडत बी.के. पाटील यांच्या स्नुषा प्रा. मानसी भोसले-पाटील यांनी बाजी मारली. रेठरेहरणाक्षमध्ये राष्ट्रवादीचे जि.प. माजी सदस्य धनाजी बिरमुळे यांच्या पत्नी शुभांगी धनाजी बिरमुळे या केवळ दोन मतांनी विजयी झाल्या. कुंडलवाडीमध्ये राष्ट्रवादी व महाडिक गटाच्या सरपंच पदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. पोस्टाच्या एका मताने महाडिक गटाच्या स्वाती वाडेकर या विजयी झाल्या. हुबालवाडीमध्ये बॉम्बे व्यापार समुहाचे बाबुराव हुबाले यांच्या पत्नी मंगल हुबाले यांनी बाजी मारली.

Back to top button