

तासगाव : जरंडी (ता. तासगाव) येथे शेतात व पडक्या विहिरीत लागवड केलेल्या गांजाच्या शेतीवर तासगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चार लाख रुपये किमतीचा 40 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुनील बाबू लोंढे (वय 35, रा. काटे शिवरी वस्ती, जरंडी) याला अटक करण्यात आली. याबाबत हवालदार अमित रघुनाथ परीट यांनी फिर्याद दाखल केली आहे.
संशयित सुनील लोंढे याने त्याच्या मळ्यातील राहत्या घराशेजारी आणि घरामागील पडक्या विहिरीत गांजाची लागवड केली असल्याची माहिती हवालदार परशुराम महाजन व प्रकाश पाटील यांना मिळाली. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ व पथकाने खातरजमा करण्यासाठी जरंडी ते दहीवडी रस्त्यावरील संशयित सुनील याच्या काटे शिवरी येथील वस्तीवर छापा टाकला. यावेळी संशयित सुनील हा घरातून बाहेर आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गांजाची लागवड केल्याची कबुली दिली.
या छाप्यात तीन ते पाच फूट उंचीची गांजाची 41 झाडे जप्त करण्यात आली. संशयित सुनील लोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात अमली औषधी व द्रव मनप्रभावी पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विनय गोडसे करीत आहेत. पथकात पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, अविनाश घोरपडे, सूरज मराठे, विनय गोडसे, उत्तम ओमासे, अमोल चव्हाण, प्रकाश पाटील, परशुराम महाजन, प्रशांत चव्हाण, अजित मोरे, कपिल खाडे व संभाजी शिंदे यांचा समावेश होता.