सांगली : कुपवाडसाठी 253 कोटीची भुयारी गटार योजना मंजूर

सांगली : कुपवाडसाठी 253 कोटीची भुयारी गटार योजना मंजूर
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कुपवाड आणि परिसराचा ड्रेनेजचा प्रश्न कायमचा निकाली काढणार्‍या भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून 253 कोटीची ही योजना दोन वर्षात पूर्ण करू, अशी माहिती महापालिकेचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. प्रस्तावानंतरच्या बैठकीनंतर एका महिन्याच्या आत शासनाने या योजनेला मंजुरी दिली. सांगलीच्या इतिहासात इतक्या मोठ्या रकमेची ही पहिलीच योजना आणून आम्ही आमचा शब्द पाळला असल्याचे त्यांनी सांगितले.

सूर्यवंशी यांनी सांगितले की, कुपवाड शहरपासून ते यशवंतनगर, अहिल्यानगर, वारणाली, बालाजीनगर, गंगानगर, वान्लेसवाडी, भारती हॉस्पिटल परिसर, विजयनगर, गव्हर्मेंट कॉलनी, तुळजाईनगर, कुंभारमळापर्यंतच्या विस्तारीत भागासाठी ही योजना असेल. 270 किलोमीटरची पाईपलाईन आणि अहिल्यानगर, तुळजाईनगर, कुंभार मळा इथे तीन पंप स्टेशन्स, पंपिंग मशिन्स असलेली ही योजना खूप महत्वाची आहे. योजना तयार करतानाच सन 2038 आणि त्यानंतरची या भागाची लोकसंख्या अंदाजे 4 लाखापर्यंत असेल असे गृहीत धरून तयार करण्यात आली आहे. योजनेसाठी लागणार्‍या जमिनीचे संपादन पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेमुळे शेरीनाल्यावर पडणारा ताण कमी होणार आहे. कुपवाड आणि संबंधीत भागातून येणारे पाणी शेरीनाल्यामध्ये येत होते, आता हे पाणी या योजनेतून कुंभारमळ्यातील मलशुध्दीकरण केेंद्रात आणले जाईल. इथे जवळपास तीन एकराच्या जागेत 27 एमएलडी क्षमतेच्या एसबीआर पद्धतीच्या मलशुध्दीकरण केेंद्रातून हे वेस्ट वॉटर एक किलोमीटरवर असलेल्या ओढ्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

योजनेबाबत 22 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक झाली आणि एका महिन्याच्या आत तिला शासनाने मंजुरी दिली. अमृत योजनेअंतर्गत राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 192 योजनांपैकी आपल्या योजनेला सर्वात जास्त निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेमुळे हे शक्य झाले. भारतीय जनता पार्टीच्या 2018 च्या जाहिरनाम्यात दिलेल्या वचननाम्याची पुर्तता आम्ही करत आहोत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा लवकरच शुभारंभ केला जाईल, अशी माहिती प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news