

जत : ‘मी महसूलमंत्र्यांच्या कार्यालयात नोकरीला आहे. तुम्हाला मंत्रालयात क्लार्क पदावर शासकीय नोकरी लावून देतो’, अशी बतावणी करून तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. रणजित तुकाराम कुंभार (वय 40, रा. भोसे, ता. पंढरपूर) याच्याविरोधात जत पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित खिलारे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून रणजित कुंभार याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2023 ते ऑगस्ट 2025 या दोन वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. दरम्यान, याबाबत आणखी काही युवकांनी जत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली आहे. चौकशीदरम्यान आणखी 6 जणांचे पैसे त्याने घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संशयित रणजित कुंभार याने सागर मच्छिंद्र खिलारे, त्याचा चुलत भाऊ व एका नातेवाईक, अशा तिघांना, क्लार्क तसेच मंत्रालयात शिपाई पदावर नोकरी मिळवून देतो, असे सांगून मोठी रक्कम घेतली. पैशाचे व्यवहार टप्प्या-टप्प्याने रोख व बँकेमार्फत झाले. त्यानंतर संशयित रणजित कुंभार याने जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या नावाने बनावट निवड आदेश देखील पाठवले. त्यानंतर आदेश लवकर मिळतील, असे सांगूनही प्रत्यक्षात कोणतीही निवड न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. तसेच आणखी काही व्यक्तींकडूनही ‘परवाना मिळवून देतो’ असे सांगून त्याने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे यामागे फसवणुकीचे मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे.
नोकरीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले
तक्रारदार खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 पासून रणजित कुंभार याने खिलारे यांचे भाऊ व अन्य नातेवाईकांना क्लार्क व मंत्रालयात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. याबदल्यात टप्प्या-टप्प्याने रोख व बँक खात्यातून असे एकूण 40 लाख रुपये घेतले. या सर्व व्यवहारासंबंधीचे पुरावे खिलारे कुटुंबीयांनी पोलिसांकडे सादर केले. बहुतांश रक्कम तीन बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे, तर उर्वरित रोखीने घेतली आहे.
बनावट निवड आदेश पाठवून दिशाभूल
डिसेंबर 2024 मध्ये रणजित कुंभार याने खिलारे यांना जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या नावाने बनावट निवडसूची व्हॉट्स ॲपवर पाठवली. यात खिलारे यांच्यातील दोघांची निवड झाल्याचे दाखवण्यात आले होते. हे आदेश 30 एप्रिल 2015 रोजी मिळतील, असे सांगण्यात आले. मात्र तसे न झाल्याने खिलारे यांनी वारंवार संपर्क साधला, पण त्यांनी निवडपत्रे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक बिरप्पा लातुरे करत आहेत.