

तासगाव : गारमेंट व लहान उद्योग उभारणी करण्यासाठी मदत करतो, ज्यादा व्याज मिळवून देतो, असे आमिष दाखवून तासगाव परिसरातील 12 महिलांची 38 लाख 54 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुपवाड येथील एकावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तेजस्वी उमेश पोतदार (रा. विटा रोड, सय्यद प्लॉट कॉलनी, तासगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी स्वतंत्र ओबीसी फाऊंडेशनचा अध्यक्ष रविकुमार स्वामी (रा. कुपवाड) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित रविकुमार याने फिर्यादी तेजस्वी यांना, तुम्ही महिलांचा ग्रुप तयार करा, असे सांगितले. त्यानुसार तेजस्वी यांनी मैत्रीण पूनम मुळे यांच्या मदतीने तासगाव परिसरातील महिलांना याची माहिती देऊन त्यांना एकत्र केले. त्यावेळी संशयित रविकुमार याने, महिलांनी बचत गोळा केल्यास त्यावर 10 टक्के व्याज देतो, असे आमिष दाखविले. तीन वर्षांनंतर मुद्दल परत देतो, महिलांना गारमेंट उद्योग व इतर लहान व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
उद्योग उभारणीसाठी व कागदपत्रे तयार करण्यासाठी त्याने महिलांकडून सन 21 ते 24 अखेर 53 लाख 63 हजार 204 रुपये फी अन्य कारणे सांगून जमा केली. मात्र गेल्या वर्षभरात उद्योग उभारणी किंवा व्याज परतावा दिला नाही. याबाबत महिलांनी तगादा लावताच त्याने महिलांना जमा रकमेपैकी 15 लाख 54 हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित रक्कम परत देण्यास त्याने टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रविकुमार स्वामी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.