सांगली ः जिल्ह्यात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. निवडणूक काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या काळात गांजा, घातक शस्त्रे, दारू, अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. आचारसंहितेच्या काळात 371 गुन्हे दाखल करण्यात आले. दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर 1 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून 9 हजार 142 लिटर अवैध दारू, 29.673 किलो गांजा, 3 हजार 342 किलो गुटखा व 59 शस्त्रे असा 2 कोटी 4 लाख 82 हजार 789 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 371 गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील 6 हजार 899 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 45 हवे असलेले आरोपी व 6 फरारी आरोपींना पकडण्यातही पोलिसांना यश आले. 1 हजार 23 जणांना अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 2 हजार 403 परवानाधारक शस्त्रे असून 222 सवलत मिळालेली शस्त्रे वगळून सर्व शस्त्रे ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यास शांतता कमिटीच्या 33, पोलिस मित्र 31 व 15 जनता दरबार घेण्यात आले. स्थानिक पोलिस ठाणे व सीएपीएम यांच्या संयुक्त पथकाने 357 पथसंचलन व 156 दंगा काबू योजना राबविल्या. बंदोबस्तासाठी 9 निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात होत्या. जिल्ह्यातील 86 टक्के अधिकारी व अंमलदारांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना प्रलोभन देऊ नये, कोणत्याही वस्तूंचे वाटप होऊ नयेे, यासाठी ड्रोन कॅमेर्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमेवर 9 ठिकाणी चेकपोस्टही कार्यान्वित होते. मतदानाच्या आधी 72 तास आंतरराज्य सीमेवरील सर्व रस्ते सील करण्यात आले होते. पोलिस नियंत्रण कक्ष, डायल 112 व सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा समन्वय, पोलिसांची गस्त यामुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी पोलिस दलामार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. तरीही फेक व्हिडीओ, सोशल मीडियावर फेक पोस्ट टाकण्यात आल्या. तासगाव तालुक्यात निवडणूक कारणावरून मारहाण झाली. एक-दोन ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकारही घडले. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी 10 दखलपात्र गुन्हे व 10 अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे विशेष शाखेचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.