

सांगली : पुण्यातील 350 कोटींच्या भूखंड घोटाळ्याबाबत आमदार जयंत पाटील यांनी सकाळी एक ट्विट केलं, पण त्याला घाबरत नाही. यापूर्वी दहावेळा आरोप झाला आहे, त्यात कसलेच तथ्य नाही. पण ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचा विषय काढला की जयंत पाटील अस्वस्थ का होतात?, आम्ही टोप्या फेकल्या, त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या? तुम्ही धुतल्या तांदळासारखे असाल, तर अस्वस्थ का होता? काचेच्या घरात बसून दुसर्याच्या घरावर दगड मारणे बंद करा, अशी टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
महापालिकेतील आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आ. जयंत पाटील सकाळी ट्विट करून 350 कोटींच्या जमीन घोटाळ्याबाबत बोलले. मात्र, आम्ही याला घाबरत नाही, अस्वस्थ देखील होत नाही. यापूर्वी दहावेळा आरोप झाले आहेत. त्यात काहीही सिध्द झाले नाही. आता अकराव्यावेळी देखील चौकशी होऊ दे, घाबरत नाही. पण ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचा विषय निघाल्यावर जयंत पाटील अस्वस्थ का होत आहेत? मी त्यांचे नाव घेतले नव्हते. एक माजी अर्थमंत्री, लॉटरी घोटाळा, एक ठाणे जिल्ह्यातला आमदार, एका बिल्डरची डायरी, एक पक्षाचा नेता, त्याचा वाशी मार्केटमधील घोटाळा, अशा आम्ही टोप्या फेकल्या, पण त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या, असा सवालही मंत्री पाटील यांनी केला.
‘तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे असाल, तर अस्वस्थ का होताय’, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, राजारामबापू पाटील यांच्यावर आ. गोपीचंद पडळकर बोलले, ते आम्हालाही मान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य नाही. आ. पडळकर यांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना समज दिली आहे. पण ते कारण काढून आ. जयंत पाटील बचाव नावाची सभा झाली. जयंत पाटील सध्या साईडलाईन झाले आहेत. त्यांना लाईमलाईटमध्ये आणण्यासाठी ती सभा होती. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांची ताकद दिसून येईल. मात्र त्या सभेत आ. पडळकर बाजूला राहिले, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले. या सभेत त्यांना आका, टरबूजा म्हटले गेले. आई, पत्नी याविषयी बोलले गेले. आम्ही हे चालू देणार नाही. त्यामुळे दि. 1 ऑक्टोबरला सांगलीत इशारा सभा होईल.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील राजकीय संस्कृती भयंकर घसरली आहे. यासंदर्भात गेली दीड- दोन वर्षे कंठशोष करून सांगतोय, की राज्यातील प्रमुख 20 नेत्यांनी एकत्रित बसून यावर विचारविनिमय करावा. पण यावर कोणालाही काही पडलेले नाही. परिणामी कोणी काहीही बोलत आहे. आमदार पडळकर यांना जे सांगायचे, ते आम्ही सांगितले आहे, पण आ. जयंत पाटील यांची पिलावळ आमच्या नेतृत्वावर बोलत आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर मिळेल. पण आ. जयंत पाटील यांनी जाहीर करावे, की या जिल्ह्यात आजपासून अशा प्रकारचे विषय होणार नाहीत; तर आम्ही इशारा सभा रद्द करतो. मात्र त्यांनी पहिले हे जाहीर करावे.