

विटा : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने गाडी चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील टेम्पो चालक फिरोज हुसेन खान (वय 41, रा. मनमाड, आंबेडकरनगर, ता. नांदगाव) याला विटा न्यायालयाने वर्षभर कैदेची शिक्षा सुनावली. हा गुन्हा 2017 मध्ये विटा- तासगाव रस्त्यावर घडला होता.
याबाबत विटाचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले की, दि. 13 एप्रिल 2017 मध्ये एका अपघाताचा गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यातील संशयित फिरोज हुसेन खान याने टेम्पो (एम.एच. 41, जी. 5765) भरधाव वेगाने चालवून विटा ते तासगाव रस्त्याने दुचाकीवरून निघालेल्या विश्वास धनाजी पाटील (वय 25) यांना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा तपास पोलिस उपनिरीक्षक एन. बी. सावंत आणि पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांनी केला.
त्यानंतर संशयित खान याला अटक करून त्याच्या विरोधात विटा न्यायालयामध्ये गुन्हा दाखल केला होता. विटा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख यांनी खान याच्यावर भारतीय दंड विधान कलम 304(अ) अन्वये 1 वर्षे आणि कलम 279 अन्वये 3 महिने तसेच कलम 338 अन्वये 1 वर्षे आणि एम. व्ही. अॅक्ट 184 प्रमाणे 1 हजार रुपये दंड आणि साधी कैद, अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी पैरवी अंमलदार म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र महाडिक यांनी काम पाहिले. विशेष सरकारी वकील मनोज भांदुर्गे आणि शारदा यादव यांनी काम
पाहिले.