सांगली : वडगावात घरफोडी; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास | पुढारी

सांगली : वडगावात घरफोडी; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

तासगाव : वडगाव (ता. तासगाव ) येथील विलास नारायण पाटील (वय 56) यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यासह एक लाख 84 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी विलास पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : फिर्यादी विलास पाटील आपले घर बंद करून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांचे घर फोडले. घरात असणार्‍या कपाटातील रोख 95 हजार रुपये, 69 हजार रुपयांचे सोन्याचे तर 20 हजार रुपयांचे चांदीचे दागिने असा 1 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ठसेतज्ज्ञांना बोलाविण्यात आले होते. सांगलीहून श्वानपथक मागविण्यात आले होते. परंतु, श्वान परिसरात घुटमळले.

Back to top button