

महापालिकेची स्थायी समिती सभापती निवडणूक गुरूवारी ऑनलाईन अॅपद्वारे होणार आहे. स्थायी समितीमधील भाजपचे सर्व 9 नगरसेवक हैद्राबाद सहलीवर गेले आहेत. भाजपने सध्यातरी धोका पार केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात फिलगूड आहे. मात्र काँग्रेसनेही धीर सोडला नाही. 'वेट अॅण्ड वॉच' चा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, भाजपमध्ये सभापतीच्या उमेदवारीवरून बेदिली होईल व त्याचा फायदा घेता येईल, अशी आशा काँग्रेसमध्ये आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे 9, काँग्रेसचे 4 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. भाजपचे बहुमत आहे. मात्र महापौर-उपमहापौर निवडणुकीत अल्पमतातील 'काँग्रेस-राष्ट्रवादी' ने बहुमतातील भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता उलथवली होती. तोच प्रयोग स्थायी समिती सभापती निवडणुकीत काँग्रेसकडून सुरू होता. भाजपच्या काही सदस्यांशी संपर्क साधून ऑफर दिली होती.
सभापतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतील काँग्रेसचे सदस्य फिरोज पठाण आणि करण जामदार यांचे बहुमताच्या जुळणीसाठी जोरात प्रयत्न सुरू होते. सांगली, मिरजेतून हालचाली गतिमान झाल्या होत्या. मात्र भाजपनेही वेळीच हालचाली करून सर्व 9 नगरसेवकांना एकत्र केले आणि शुक्रवारी सहलीवर पाठवले. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी व त्यांचा फौजफाटा या सदस्यांसोबत आहे.
भाजपच्या ज्या सदस्यांवर काँग्रेसची मदार होती, ते सदस्य संपर्काबाहेर गेल्याने काँग्रेसमधील इच्छुकांची निराशा झाली आहे. मात्र त्यांनी अजूनही धीर सोडलेला नाही. तशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू होती.
महापालिकेच्या कारभारात स्थायी समितीला विशेष महत्व आहे. महापौर-उपमहापौरपद भाजपकडून गेले असले तरी स्थायी समितीचे सभापतीपद कायम राखण्यासाठी भाजपकडून यावेळी मोठी दक्षता घेण्यात आली. त्यामुळे स्वपक्षीय 9 सदस्य ताब्यात ठेवून सभापती निवडणूक जिंकण्यातील सर्व अडथळे भाजपने पार केले आहेत. स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ 9 आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 7 आहे. स्थायी सभापती भाजपचाच होणार, असे शेखर इनामदारे यांनी सांगितले.
स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये सविता मदने, निरंजन आवटी, संजय यमगर यांच्यात मोठी रस्सीखेच आहे. जगन्नाथ ठोकळे, गजानन आलदर, सुनंदा राऊत हे सदस्यही प्रबळ इच्छुक आहेत. भाजपमधील संभाव्य बेदिलीवर काँगे्रसचे लक्ष लागले आहे. भाजपकडून सभापतीपदाची उमेदवारी कोणाला मिळणार, हे मोठ्या औत्सुक्याचे ठरत आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी प्रशासनाने शनिवारी सुटीच्या दिवशी शुक्रवारची तारीख टाकून विशेष सभेची नोटीस काढली आहे. ही कृती बेकायदा आहे. विशेष सभेची ही नोटीस रद्द करून फेर नोटीस काढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांतर्फे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण यांनी दिली.
पाटील व पठाण म्हणाले, पुणे विभागीय आयुक्तांनी महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी दि. 9 सप्टेंबर ही तारीख निश्चित केलेली आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या विशेष सभेची नोटीस घेण्यासाठी आम्ही शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत महापालिकेत होतो. मात्र सभेची नोटीस दिली नव्हती. विशेष सभेची नोटीस शनिवारी सुटीच्या दिवशी काढली आहे.
मात्र त्यावर शुक्रवारची तारीख (दि. 3 सप्टेंबर) नमूद केलेली आहे. ही नोटीस शनिवारी वाटप केली आहे. ते बेकायदा आहे. त्यामुळे स्थायी समितीतील काँग्रेस व राष्ट्रवादी सदस्यांतर्फे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. विशेष सभेची ही नोटीस रद्द करून फेरनोटीस काढण्याची मागणी करणार आहे.
महापालिकेचे सचिव चंद्रकांत आडके म्हणाले, स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी विशेष सभेची नोटीस शुक्रवारीच काढली आहे. नोटीसचे वाटप शनिवारी केले आहे. नोटीस सुटीच्या दिवशी वाटप करण्यात काहीही बेकायदा नाही.