महाराष्ट्रातील १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला : जयंत पाटील | पुढारी

महाराष्ट्रातील १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला : जयंत पाटील

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त आहे. १ लाख ५४ हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील १ लाख तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

मंगळवारी ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच १ लाख ५४ हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. त्यामुळे सुमारे १ लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.

महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा सवालही त्यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button