सांगली : सरदार पाटील यांनी बोलताना भान ठेवून बोलावे; प्रमोद सावंत | पुढारी

सांगली : सरदार पाटील यांनी बोलताना भान ठेवून बोलावे; प्रमोद सावंत

जत, पुढारी वृत्तसेवा :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच एका कामात स्वतः मजूर म्हणून कागदोपत्री दाखवून शासनाची मोठी फसवणूक केली आहे. त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावे असा प्रतिहल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी पत्रकार बैठकीत केली. या पत्रकार बैठकीस माजी आमदार विलासराव जगताप, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, शहराध्यक्ष आण्णा भिसे,संतोष कोळी, आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, मी अचकनहळ्ळी गावा बाहेर कधीच आलो आहे. मात्र, सरदार पाटील हे माजी आमदार विलासराव जगताप यांचे बोट धरून राजकारणात आले. आता त्यांची वाटचाल पुन्हा गावाकडच्या दिशेलाच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. सावंत पुढे म्हणाले, चंद्रशेखर बागेळी, बसगोंडा उदगीर, मयत बसलिंगा माळी यांच्या शेतात नाला बांधकामामध्ये तर सुभाष हाक्के, गणपती हायबते यांच्या शेतात शेततलावाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे.

कामे न करताच पैसे काढण्यात आले आहे. या कामावर प्रत्यक्ष अंकलगी गावातील एकही मजूर न घेता आपल्या गावातील मजूर लावले. याची माहिती मिळताच तेथील सरपंचासह नागरिकांनी तक्रार करायला जाताना त्यांना वाटेत गाठून मारहाण केली व तक्रार करू दिली नाही. याच तसेच सरदार पाटील यांनी अनेक मागासवर्गीय लोकांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत घेऊन कोट्यवधी रूपये गोळा केले. याचीही चौकशी काही दिवसात लागेल. त्यामुळे आमच्या नेत्यांवर बोलताना भान ठेऊन बोलावे. अन्यथा येणाऱ्या काळात त्यांनी केलेल्या सर्वच कामांची यादी जनतेसमोर ठेऊ, असा इशाराही दिला.

तालुक्यात सध्या काँग्रेस पदाधिकारी व भाजप पदाधिकारी यांच्यामध्ये श्रेयवादावरून चांगलीच जुंपली आहे. माजी आमदार जगताप यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी केल्यानंतर आ. सावंत यांनी कोणत्याही चौकशीला तयार आहे. परंतु तालुक्यातील साखर कारखान्याची जगताप यांनी वाट लावली आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली. या आरोप प्रत्यारोपाने जतचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button