सांगली : पोलिस ठाण्यात गेला तर पैसे मिळणार नाहीत; ‘ग्लोबल’कडून गुंतवणूकदारांना धमक्या!; | पुढारी

सांगली : पोलिस ठाण्यात गेला तर पैसे मिळणार नाहीत; ‘ग्लोबल’कडून गुंतवणूकदारांना धमक्या!;

सांगली : पुढारी वृत्तसेवा गुंतवणूक रकमेला दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या एस.एम. ग्लोबल कंपनीच्या संचालकांकडून गुंतवणूकदारांना गेल्या काही दिवसांपासून धमकावले जात आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तर एक पैसाही मिळणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. गेल्या आठवड्यात ग्लोबल कंपनीविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आतापर्यंत केवळ तीनच गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. यामध्ये त्यांची 92 लाखांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. कंपनीचा प्रमुख मिलिंद गाडवे (रा. सांगलीवाडी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे. याच कंपनीविरूद्ध आतापर्यंत पुण्यातील भारती विद्यापीठ व कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. गाडवे व त्याचा साथीदार अविनाश पाटील या दोघांना पंधरा दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा तपास झाल्यानंतर दोनच दिवसापूर्वी दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.

गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल करू नयेत, यासाठी गाडवेने गेल्या महिन्यात सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना मोबाईलवर मेसेज करून धमक्या दिल्या आहेत.‘माझ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला तर एक पैसाही देणार नाही’, असे त्याने सांगितले असल्याचे काही पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. गाडवेच्या धमकीला अनेकजण घाबरले आहेत. बहुसंख्य गुंतवणूकदारांनी घर, शेत विकून गुंतवणूक केली आहे. आता त्यांना जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तक्रार दाखल करण्यास पुढे येईना झाले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. गाडवेच्या मालमत्ता कुठे आहेत, याची पथकाकडून गोपनीय माहिती काढण्याचे काम सुरू आहे. पाच वर्षापूर्वी त्याने फसवणुकीचे जाळे टाकले. सांगली, कोल्हापूर व पुणे या तीन जिल्ह्यात त्याने अलिशान कार्यालये थाटली. तेथील स्थानिकांना एजंट म्हणून नेमले. त्यांनाही सुरुवातीला घसघसशीत कमिशन दिले. काही महिने त्याने गुंतवणूकदरांना दुप्पट परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी 15 ते 25 लाखांपर्यंत रक्कम गुंतविली. फसगत झालेले गुंतवणूकदार गेल्या दोन वर्षांपासून पैसे मिळविण्यासाठी धडपडत आहेत. मात्र गाडवेने सांगलीतून गाशा गुंडाळून पुणे गाठले. पण तिथेच त्याच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री पटल्यानंतर केवळ तीन गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या. तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.

प्रत्येक गुन्ह्यात गाडवेसोबत वेगळे साथीदार सांगली, पुणे व कुरुंदवाड या तीन पोलिस ठाण्यात ग्लोबल कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्ह्यात गाडवेसोबत वेगवेगळ्या साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल आहे. सांगलीत मात्र केवळ गाडवेविरूद्धच गुन्हा दाखल आहे. अविनाश पाटील याच्यावर पुणे व कुरुंदवाडमध्येही गुन्हे दाखल आहेत. सध्या तोही गाडवेसोबत अटकेत आहे.

Back to top button