कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही | पुढारी

कायदा हातात घेणार्‍यांची गय नाही

सांगली : पुढारी वृत्तसेवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी दिला. सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची पोलिस मुख्यालयातील कृष्णा हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. दयानिधी बोलत होते. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख मनीषा दुबुले, पोलिस उपअधीक्षक अजित टिके, अशोक वीरकर, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दयानिधी म्हणाले, दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यंदा मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जाणार आहे. गावोगावी मंडळाचे कार्यकर्ते उत्सावाच्या तयारीत अडकले आहेत. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा सुसज्ज आहे. कोणीही कायदा हातात घेणार्‍याचा प्रयत्न करू नये. त्यांची गय केली जाणार नाही. पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनीही मार्गदर्शन केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या. या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली.

Back to top button