सांगली : स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या ऑडिटचे आदेश | पुढारी

सांगली : स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या ऑडिटचे आदेश

सांगली : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट एलईडी प्रकल्पासंदर्भातील शासन नियम, अटी, शर्ती आणि राबविलेली निविदा प्रक्रिया, प्रकल्प अंमलबजावणी करार, प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्व बाबींचे ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेच्या स्थायी समिती सभेने प्रशासनाला दिले. 38 कोटींचा प्रकल्प 144 कोटींवर कसा गेला, असा प्रश्‍नही पुन्हा एकदा उपस्थित झाला.

महापालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती निरंजन आवटी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, करण जामदार, मनगू सरगर, गजानन आलदर, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, सविता मदने, सुनंदा राऊत, कल्पना कोळेकर, पद्मश्री पाटील, संगीता हारगे, डॉ. नर्गिस सय्यद, अनिता व्हनखडे, गायत्री कल्लोळी तसेच अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट एलईडीप्रकल्पाबाबत नगरसेवकांच्या तक्रारी पाहता प्रकल्पाच्या संपूर्ण ऑडिटचा निर्णय घेतल्याचे सभापती आवटी यांनी सांगितले.

स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविण्यासंदर्भात शासनाचे नियम, अटी, निविदेतील अटी, शर्ती, कंपनीबरोबर झालेला करार व प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्व बाबींचे ऑडिट करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती आवटी यांनी दिली. स्मार्ट एलईडी प्रकल्प 38 कोटी रुपयांवरून 144 कोटींवर कसा गेला, याबाबत प्रश्‍न उपस्थित होत असल्याने त्याबाबतही ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आवटी यांनी दिली.

सांगलीत शिवाजी हौसिंग सोसायटी चैतन्य बंगला ते ज्ञानहंस बंगला ते इंदिरा बंगला ते सरस्वती बंगला वाय टाईप रस्ता चरीसह हॉटमिक्स डांबरीकरणाने सुधारणा करण्याच्या वाढीव कामास मान्यता दिली. शिवाजी हौसिंग सोसायटी माधवनगर रोडलगत गोपाळकुंज कॉम्प्लेक्स ते संजीवनी मेडिकल ते शिवनिवासपर्यंत रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाने सुधारणा करण्याच्या वाढीव कामास मान्यता
दिली.

माधवनगर रोडला शॉपिंग कॉम्प्लेक्स

महापालिकेतर्फे माधवनगर रोड येथे 81.96 लाख रुपये खर्चून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. प्राप्त निविदांपैकी कमी दराच्या निविदाधारकाकडून काम करून घेण्यास स्थायी समिती सभेने मान्यता दिली.

Back to top button