सांगली : मिरजेत महिलेला 25.50 लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : मिरजेत महिलेला 25.50 लाखांचा गंडा

मिरज; पुढारी वृत्तसेवा : ओला कॅब स्कीम, स्वस्तात प्लॉट खरेदी अणि गुंतवणूक केलेल्या रकमेवर वर्षाला 10 टक्के परताव्याच्या आमिषाने चौघांनी रेश्मा नाजीर शेख यांना 25 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी शेख यांनी जहाँरा अन्वरहुसेन मुल्ला, अन्वर मुल्ला, शमाईला उर्फ शुम्मी अन्वरहुसेन मुल्ला (सर्व रा. शास्त्री चौक, मिरज) आणि शाहीद सज्जाद भोकरे (रा. खतीब नगर, मिरज) यांच्याविरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील सर्व संशयितांनी रेश्मा शेख यांना ओला कॅब स्कीम करून देतो. तसेच रेल्वे ब्रीजजवळ अकबर मोमीन यांचा एक प्लॉट असून तो स्वस्तात खरेदी करून देतो, असे सांगितले होते. त्यानंतर संशयितांनी शेख यांना काही रक्कम गुंतवल्यास त्यावर वार्षिक 10 टक्के परतावा देण्याचे देखील आमिष दाखविले होते.

या आमिषाला बळी पडून रेश्मा शेख यांनी ओला कॅबसाठी 15 लाख 20 हजार रुपये तर अकबर मोमीन यांचा प्लॉट खरेदी करण्यासाठी 10 लाख 30 हजार रुपये संशयितांना दिले होते. परंतु संशयितांनी ओला कॅबही सुरू केली नाही आणि मोमीन यांचा प्लॉट देखील खरेदी करून दिला नाही. त्यामुळे शेख यांनी संशयितांकडे दिलेले पैसे परत मागितले. परंतु त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने शेख यांनी चौघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.

 

Back to top button