

इस्लामपूर; मारुती पाटील : नोकरदार, पेन्शनधारक, वाहनधारक यांच्याबरोबरच आता उत्पन्न वाढलेल्यांचे रेशनधान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा लोकांचा शोध घेण्यासाठी 1 सप्टेंबरपासून रेशनकार्ड पडताळणी मोहीम सुरू होत आहे. तत्पूर्वी उत्पन्न वाढलेल्या कार्डधारकांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
शासनाकडून कमी उत्पन्न असलेल्या लोकांना रेशनकार्डावर सवलतीच्या दरात व कोरोना महामारीपासून मोफत धान्य मिळत आहे. ज्या लोकांची परिस्थिती सुधारली आहे, उत्पन्न वाढले आहे, असे अनेक लोक अजूनही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. याशिवाय गंभीर बाब म्हणजे सवलतीवर व मोफत मिळणारे हे धान्य अनेक लोक खाण्यासाठी न वापरता त्याची विक्री करत आहेत. तर काही लोक जनावरांच्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. तर दुसरीकडे अनेक गोरगरिब कुटूंबे शासनाच्या या योजनेपासून वंचित रहात आहेत.
या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने आता ज्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे. तसेच जे लोक नोकरदार, पेन्शनधारक आहेत व ज्यांच्याकडे वाहन आहे, अशा लोकांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पन्न वाढलेल्या लोकांनी 30 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून देऊन या योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वाळवा तालुक्यातील 271 कार्डधारकांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले आहेत, असे पुरवठा निरीक्षक बबन करे यांनी सांगितले.
दि. 1 नोव्हेंबरपासून पुरवठा निरीक्षकांच्यामार्फत सर्व रेशनकार्डांची पडताळणी करून अशा लोकांचा शोध घेतला जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न वाढूनही ते लोक या योजनेचा लाभ घेत असतील तर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे. तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक घेवून याबाबत जनजागृतीही करण्याचे आवाहन केले आहे.
ज्यांची परिस्थिती सुधारली आहे, उत्पन्न वाढले आहे, जे लोक शासनाच्या योजनेचा अजूनही लाभ घेत आहेत. अशा लोकांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे. जेणेकरून गोरगरिब लोकांच्या पदरी धान्य पडेल. अशा लोकांच्या शोधासाठी 1 नोव्हेंबरपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.
– प्रदीप उबाळे, तहसीलदार, वाळवा.