सांगली : आष्ट्यातील घाडगे टोळी तडीपार | पुढारी

सांगली : आष्ट्यातील घाडगे टोळी तडीपार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : खुनाचा प्रयत्न, खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आष्टा (ता. वाळवा) येथील नरेंद्र घाडगे टोळीला सोमवारी सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली.

नरेंद्र उर्फ नर्‍या जालिंदर घाडगे (वय 30), रणजीत संभाजी घाडगे (35), संतोष आनंदा आलदर (22, तिघे रा. घाडगे मळा, आष्टा), अवधूत सुरेश परीट (20), सागर बसाप्पा कोळी (21, परीट गल्ली, आष्टा) व प्रताप उर्फ प्रतीक बाबासाहेब कांडगावे (21, दुधगाव, ता. मिरज) अशी तडीपार केलेल्या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. यातील नरेंद्र घाडगे हा टोळीप्रमुख आहे.

टोळीविरूद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. पण जामिनावर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच रहायच्या. त्यामुळे आष्टा पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध तडीपार कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांना सादर केला होता.

गेल्या काही दिवसांपासून या प्रस्तावावर सुनावणी सुरू होती. ती सोमवारी पूर्ण झाली. गेडाम यांनी टोळीतील सर्वांना सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केल्याचा आदेश बजावला आहे. त्यांना हे तीन जिल्हे सोडून कुठे राहणार आहेत, याबद्दल विचारणा करून त्यांना तिथे सोडण्यात येणार आहे. मंगळवारी टोळीला ताब्यात घेतले जाणार आहे.

Back to top button