

सांगली : महापालिका आयुक्तांच्या ‘नागरिक दरबार’मध्ये गुरुवारी 30 तक्रारी दाखल झाल्या. अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा, कचर्याची समस्या, अस्वच्छता याबाबत प्रामुख्याने तक्रारी होत्या. व्यापक मोहीम राबवून तक्रारींचे प्रमाण कमी करण्यात येईल, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.
महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात गुरुवारी ‘नागरिक संवाद, तक्रार निवारण’ हा उपक्रम झाला. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, शिल्पा दरेकर, विजया यादव तसेच सहायक आयुक्त, खातेप्रमुख उपस्थित होते. ‘नागरिक संवाद, तक्रार निवारण’ हा उपक्रम खर्या अर्थाने ‘नागरिक दरबार’ या स्वरूपात होत आहे. नागरिक आपल्या व्यक्तिगत अथवा सार्वजनिक तक्रारी महापालिकेत समक्ष येऊन मांडत आहेत. या तक्रारींची दखल घेतली जात आहे. त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आयुक्त गांधी यांनी प्रत्येक तक्रारीकडे संबंधित अधिकार्याचे लक्ष वेधले. तक्रारीचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. स्वच्छतेबाबत उपायुक्त स्तरावर दैनंदिन कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये, याबाबत या बैठकीत चर्चा होईल.