मिरज : आ. खाडे यांचे मंत्रिपद निश्‍चित! | पुढारी

मिरज : आ. खाडे यांचे मंत्रिपद निश्‍चित!

मिरज; पुढारी वृत्तसेवा : सलग भाजपच्या तिकिटावर चारवेळा आमदार झालेले सुरेश खाडे यांना दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात देणार आहे. वरिष्ठांकडून फोन आल्याने ते मुंबईकडे रवाना झाले. आमदार खाडे यांच्या रुपाने मिरजेला दुसर्‍यांदा मंत्रिपद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मंगळवारी शपथविधी होणार आहे.

दरम्यान, भाजपने पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊन आपल्याला व सांगली जिल्ह्याला न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया आ. सुरेश खाडे ‘दैनिक पुढारी’ शी बोलताना दिली.

आ. खाडे हे पूर्वी रिपब्लिकन पक्षात होते. ते भाजपमध्ये आल्यानंतर जतमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. 2014 मध्ये खाडे हे मिरजेतून दुसर्‍यांदा व 2019 मध्ये तिसर्‍यांदा निवडून आले.

2014 च्या निवडणुकीत राज्यात भाजप-सेनेची सत्ता आली. पहिल्याच यादीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यांना ते मिळाले नव्हते. अखेरच्या टप्प्यात मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे भाजपने ठरवले. त्यांना सामाजिक न्यायमंत्री करण्यात आले होते. आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये खाडे यांचा समावेश होणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी त्यांची निवड निश्चित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे खाडे हे मुंबईला रवाना झाले.

खाते कोणते मिळणार?

आमदार खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. त्यांना कोणते खाते द्यायचे हे भाजपने ठरविलेले आहे. मात्र ते आज जाहीर करण्यात आले नाही. शपथविधी दरम्यान त्यांचे खाते समजणार आहे. याबाबत मिरजेत उत्सुकता आहे.

Back to top button