सांगली : स्वातंत्र्य लढ्यापासून संघ स्वयंसेवक दूर नव्हते | पुढारी

सांगली : स्वातंत्र्य लढ्यापासून संघ स्वयंसेवक दूर नव्हते

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाचे सर्वसमावेशक स्वरूप जसे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले, तसेच बदलत गेले. संघाला शह देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रसेवा दल स्थापन केले. त्यात दुही होवून काँग्रेस सेवादल निर्माण झाले त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात संघ  काँग्रेसपासून दुरावला; पण स्वातंत्र्यलढ्यापासून संघ स्वयंसेवक दूर नव्हते, असे प्रतिपादन माजीमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले.

ते म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान किती, असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यावर बोलावे लागत आहे. संघ व्यवस्थापक डॉ. हेडगेवार हे मूळचे काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्ते होते. सन 1920 साली अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात झाले. त्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते प्रमुख होते. त्या अधिवेशनाचे स्वरूप पाहून डॉ. हेडगेवार यांना देश स्वतंत्र होण्याचा दिवस जवळ येऊ लागला याची खात्री वाटू लागली. मिळणारे स्वातंत्र्य राबविण्यास मातब्बर कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने सन 1925 साली पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी संघाची स्थापना केली.

तसेच आपण करत असलेले कार्य काँग्रेस नेत्यांच्या लक्षात यावे यासाठी ते महात्मा गांधींच्यापासून निरनिराळ्या काँग्रेस नेत्यांना संघाच्या शिबिरात निमंत्रित करत होते. डॉ. हेडगेवार यांच्या राष्ट्रीय विचाराच्या मुशीत तयार झालेले संघ स्वयंसेवक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जहाल व्यक्‍तिमत्त्वाने आकर्षित होऊन स्वातंत्र्य चळवळीत काम करीत होते.

ते म्हणाले, क्रांतिवीर बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली सन 1930 व 32 साली जंगल सत्याग्रह करणार्‍यांच्या तुकडीत इस्लामपूरचे प्रेमजीभाई आसर, माधवराव आढळे हे संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यात त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली. हेच प्रेमजीभाई 57 मध्ये रत्नागिरीतून जनसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते.

डांगे म्हणाले, शिराळा तालुक्यात पावलेवाडीची खिंड दगड रचून रस्ता बंद करून बिळाशीत अतिउंच तिरंगा फडकवून स्वातंत्र्य घोषित करणारे काँग्रेस नेते बर्डे गुरुजी, बाबुराव चरणकरदादा, बिळाशीचे दत्तोबा लोहार यांच्या बरोबरीने अनेक संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते.

स्वातंत्र्योत्तर काळात 1954 साली पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असणारे दादरा नगर हवेली, सेल्वासा हे तर संघ चालक विनायकराव आपटे यांच्या प्रोत्साहनाने नाना काजरेकर, सुधीर फडके, राजाभाऊ पाखणकर यांच्या सहभागाने स्वतंत्र होऊन भारतात सामील झाले. हीच प्रेरणा घेवून जगन्नाथराव जोशींच्या नेतृत्वाखाली गोवामुक्‍तीचा लढा चालू झाला. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते. जस जसा लढ्याचा जोर सुरू झाला तेव्हा गोवा मुक्‍तीसाठी सर्व पक्ष सरसावले. या सार्‍यातून गोवा मुक्‍त झाला. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला तो स्वातंत्र्य चळवळीशी फारकत घेऊन नव्हे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Back to top button