सांगली : ‘जलसंपदा’चा कारभार चव्हाट्यावर | पुढारी

सांगली : ‘जलसंपदा’चा कारभार चव्हाट्यावर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जलसंपदा विभागाचे येथील कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांना एक लाख रुपयाच्या लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर जलसंपदा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही वर्षापासून जलसंपदा विभागाची कोट्यवधींची कामे सुरू आहेत. ही कामे मंजूर होण्यासाठी टक्केवारी द्यावी लागते, अशी चर्चा अनेक वेळा होते. मात्र त्याबाबत पुरावा किंवा त्याबाबत तक्रार देण्यास कोण पुढे येत नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व पाटबंधारेमंत्री अजित पवार यांच्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत गाडीभर पुरावे असल्याचे जाहीर केले होते. गेल्या सात वर्षात जलसंपदा विभागात कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. ती कामे सुरू आहेत.

जिल्ह्यात म्हैसाळ, टेंभू योजनेची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. आता तर कालव्याऐवजी पाईपलाईनने पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ही कामे सुरू आहेत. या विभागात काम मिळण्यासाठी टक्केवारी द्यावी लागते अशी चर्चा सर्वत्र होत असते. मात्र अद्यापपर्यंत त्याबाबत कोणी तक्रार दिलेली नव्हती. कामगार पुरवण्यासाठी निविदा काढण्यात आलेली आहे. त्यात 4 टक्के प्रमाणे एक लाख रुपये काम मिळण्यासाठी मागणी झालेली होती. ही मागणी कार्यकारी अभियंता नलवडे यांनी केल्याची तक्रार संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आठ दिवसांपूर्वी दिली. त्यानुसार या विभागाने सापळा लावला. तक्रारदार पैसे घेऊन नलवडे यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र त्यांनी त्या ठिकाणी पैसे न स्वीकारता त्यांचे नातेवाईक असलेले आणि या गुन्ह्यातील दुसरे संशयित आरोपी राहुल कणेगावकर यांच्याकडे ही रक्कम देण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. त्यामुळे जलसंपदा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईनंतर तरी या विभागातील कारभार सुधारणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

निकृष्ट कामाची चौकशी कधी?

जलसंपदा विभागाने जिल्ह्यात केलेल्या कामाबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. कालव्याची कामे निकृष्ट झाल्याने ते अनेक ठिकाणी फुटले आहेत. हलक्या दर्जाच्या पाईप बसवल्याने पाणी शेतात जात नाही, अशा तक्रारी शेतकरी करीत आहेत. याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई होणार का, असा प्रश्‍न केला जातो आहे.

Back to top button