सांगली : सावधान... साथ रोगांचा खतरनाक धोका | पुढारी

सांगली : सावधान... साथ रोगांचा खतरनाक धोका

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून साथ रोगांचा धोका वाढला आहे. संसर्गजन्य ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आठ-दहा दिवस उपचार करूनही आजार बरा होत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे या विविध रोगांची लक्षणे व प्रतिबंधाबाबत काय काळजी घ्यावी याची ही माहिती.

त्वचेखाली रक्‍तस्त्राव होणे, वारंवार उलट्या, पोटदुखी, सौम्य किंवा उच्च ताप, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, स्नायू, हाडांमध्ये वेदना किंवा सांधेदुखी, नाकातून रक्‍त येणे, एकदम तीव्र ताप येणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना होणे, चव – भूक नष्ट होणे. छातीसह अन्य ठिकाणी पुरळ येणे, त्वचेवर व्रण उठणे.

प्रमुख लक्षण ताप आहे. मात्र तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. तीव्र सांध्यांच्या वेदना असतात. मळमळ, पूरळ, डोकेदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणे आहेत.

चिकुनगुनिया पसरविणारे मच्छर दिवसा दंश करतात. हवामान योग्य असेल तर लांब हाताचे कपडे वापरून उघडी त्वचा कमी करा. मच्छर घराबाहेर ठेवण्यासाठी दरवाजा आणि खिडकीला जाळ्या वापरा. घराच्या सभोवताली आणि आसपास पाणी साचणार नाही याची काळजी गरजेची. कारण त्यात मच्छरांसाठी प्रजनन-स्थळे बनण्याची क्षमता असते. न वापरलेल्या स्टोरेज कंटेनर्स, जुने टायर काढून टाका. पाणी साठवणारे कंटेनर झाकून ठेवावेत. परिसर स्वच्छ ठेवा. एसी ट्रे आणि फ्रिज ट्रे नियमितपणे साफ केले असल्याची खात्री करा. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या, रक्‍ततपासणी केल्यास योग्य निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत होते. चार-पाच दिवस पूर्णपणे विश्रांती हे या दोन्ही आजार बरे होण्यात महत्त्वाचे उपाय आहेत.

व्हायरल फिव्हर म्हणजे काय ?

व्हायरल फिव्हर म्हणजे विषाणूंच्या संक्रमणामुळे होणार्‍या आजारांचा एक समूह. यातील काही आजार हे त्यांच्या विशिष्ट लक्षणांवरून किंवा त्यांच्या ठराविक अवयवांना होणार्‍या प्रादुर्भावापासून ओळखता येतात. फार थोड्या व्हायरल फिव्हरसाठी ठराविक चाचण्या उपलब्ध आहेत. यात विषाणूंच्या संक्रमणाने ताप आल्यानंतर त्याला व्हायरल फिव्हर म्हटले जाते

व्हायरल फिव्हरवरील उपचार आणि प्रतिबंध

व्हायरल फिव्हर हे काही स्वच्छतेच्या आणि राहणीमानाच्या सवयी बदलल्यास सहज टाळता येऊ शकतात. यासाठी दूषित पदार्थांचे सेवन टाळणे, स्वच्छता राखणे, भरपूर पाणी पिणे, अतिथंड पदार्थांचे सेवन टाळणे, पौष्टिक आहार घेणे, आजार झालेल्या व्यक्‍तींशी संपर्क टाळणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. व्हायरल फिव्हरचे उपचार हे मुख्यत्वे आजाराच्या लाक्षणिक स्वरूपावर अवलंबून असतात. व्हायरल फिव्हरसाठी एन्टीव्हायरल औषधे देण्याची गरज पडते. सध्या वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरचे प्रमाण अधिक दिसते.

व्हायरल फिव्हरची लक्षणे

बरेचसे व्हायरल आजार हे श्वासाद्वारे किंवा दूषित अन्नपदार्थ किंवा पेय घेतल्याने पसरतात. व्हायरल फिव्हरचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर रक्‍ताद्वारे शरीरात पसरतात आणि सुप्त अवस्थेमध्ये राहतात. सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्‍तपणा जाणवणं, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना होणं ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. ताप हा मध्यम ते तीव्र स्वरूपाचा, तीव्र किंवा चढ-उतारांचा असू शकतो. डोळ्यांना लाली चढणे, डोळ्यातून पाणी वाहणे आदी लक्षणे दिसतात.

Back to top button