सांगली : वाहनांच्या विमानिश्‍चितीत नवा पॅटर्न! | पुढारी

सांगली : वाहनांच्या विमानिश्‍चितीत नवा पॅटर्न!

सांगली; विवेक दाभोळे : वाहनांचा विमा आतापर्यंत सरसकट निश्‍चित होत होता. मात्र आता नवीन बदलानुसार वाहनाची विमानिश्‍चिती होणार आहे. आता वापरानुसार वाहनांची तीन गटात वर्गवारी होईल. मात्र हे धोरण नवीन खरेदी वाहनांसाठी राहणार की जुन्या वाहनांना देखील लागू करणार याबाबत अद्याप स्पष्टता दिसत नाही.

कोरोनाकाळात अनेकांची वाहने जाग्यावर ठप्प होती. तसेच निर्बंध सैल होत असतानाच्या काळात अनेक चाकरमान्यांनी आपल्या वाहनांचा वापर वाढविला. तर काहींनी आपले मालकीचे वाहन असून देखील उपलब्ध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेतला. मात्र असे असले तरी या वाहनमालकांना आपल्या वाहनांचा विमा भरावा लागला होता. यातूनच वापर कमी- जास्त असलेल्या वाहनांना सरसकट एकच विमा रक्कम का भरायची? पाश्‍चात्य देशात असे नाही तर वाहनांचा किती वापर होतो यावर विमा रक्कम आकारणी निश्‍चिती होते. याकडे बोट दाखवित आपल्या देशात अशीच तरतूद करण्याचा प्रवाह चर्चेत आला. तसेच अन्य देशात असलेले ‘अ‍ॅड ऑन धोरण’ आपल्या देशात लागू करण्याची मागणी वाढली. यानंतर नुकतेच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहन विमा धोरणामध्ये बदल जाहीर केला. तसेच ‘अ‍ॅड ऑन’ वाहन विम्यासाठी तीन धोरणे लागू करण्यासाठी मंजुरी दिली. यानुसार आता विमा कंपन्यांना विविध तीन पॉलिसी करता येणार आहेत. यात सर्वाधिक मुलभूत बदल म्हणजे वाहनचालक आपल्या वाहनाचा ज्या प्रमाणात वापर करेल त्यानुसार विमा हप्ता आकारला जाईल. अर्थात वाहन सुरक्षितरित्या न चालवल्यास वाहनमालकास त्याचा मात्र चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.

यानुसार एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक वाहने असल्यास त्यांचा एकच विमा काढणेही शक्य होणार आहे. मात्र याबाबत काही प्रश्‍न देखील केले जात आहेत. प्रामुख्याने हे धोरण सरकसकट वाहनांना लागू होणार की नवीन खरेदी केलेल्या वाहनांना देखील या तरतुदीखशली आणले जाणार याबाबत अद्याप काहीच स्पष्टता झालेली नाही. तसेच वाहनांचा विमा यातून स्वस्त होणार की महागणार, याबाबत देखील काहीच स्पष्टता झालेली
नाही.

पे ऍज यू ड्राइव्ह : या प्रकारात वाहनाच्या वापरानुसार विमा हप्ता आकारणी होईल. ज्या वाहनाचा वापर कमी आहे त्यास कमी हप्ता, ज्याचा अधिक वापर त्याला अधिक हप्ता द्यावा लागेल. बहुसंख्य चाकरमाने कामाच्या ठिकाणी जाण्या – येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. केवळ सुटीदिवशी आपल्या वाहनाचा वापर करतात. त्यांचा वाहन वापर कमी आहे. मात्र त्यांना इतरांप्रमाणेच विमा हप्ता भरावा लागत होता.

हाऊ यू ड्राइव्ह : अनेकवेळा वाहनचालक विनाअपघात गाडी चालवत असेल तर अशा सुरक्षित वाहनचालकांसाठी कमी विमा हप्ता आकारला जाईल. भरधाव वेगात निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरणार्‍या मालकांसाठी अधिक विमा हप्ता राहिल. परिणामी अपघात प्रमाण कमी होऊ शकते.

फ्लोटर पॉलिसी : कुटुंबासाठी सर्व व्यक्‍तींसाठी एकत्रित विमा कवच एका पॉलिसीअंतर्गत घेतो तर अन्य व्यक्‍तीकडे वाहनांसाठी स्वतंत्र विमा काढला जातो. मात्र यात एकाच व्यक्‍तीच्या नावावर असलेल्या सर्व वाहनांचा एकच विमा काढता येणार आहे.

Back to top button