सांगली : जिल्ह्यात ‘एटीएम’ची सुरक्षा आली धोक्यात !

सांगली : जिल्ह्यात ‘एटीएम’ची सुरक्षा आली धोक्यात !

सांगली; सचिन लाड : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बँकांच्या 'एटीएम'ना टार्गेट केले आहेत. बहुतांश एटीएममध्ये रखवालदार नाहीत. रात्रंदिवस दरवाजा उघडा असतो. सीसीटीव्ही बंद स्थितीत आहेत. लाखो रुपये मशिनमध्ये ठेवून बँका बिनधास्त असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीयकृत बँकांसह, खासगी सहकारी बँका, पतसंस्था, अनेक फायनान्स कंपन्याच्या शाखा सांगली, मिरजेसह जिल्ह्यात आहेत. यातून दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होतात. ग्राहकांच्या सोयीसाठी सर्वच बँकांनी आता एटीएम सेंटर सुरू केले आहे. आठवड्यात एक – दोन वेळा तरी एटीएममध्ये पैशाचा भरणा केला जातो, पण एटीएम व पर्यायाने पैशांच्या सुरक्षेबाबत अनेकवेळा बँकांमध्ये निरुत्साह दिसतो.
देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे गेल्या महिन्यात सराईत टोळीने हवेत गोळीबार करत पैशाने भरलेले एटीएम पळवून नेले. नंतर सांगलीत शंभरफुटी रस्त्यावर एसटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसापूर्वी डफळापूर (ता. जत) येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे.

जिल्ह्यात सातत्याने अशा घटना घडत आहेत. यामुळे या बॅँकांना सुरक्षेबाबत कोणतीही काळजी का घ्यावीशी वाटत नाही, असा सवाल ग्राहक करत आहेत. खरे तर या बँकांच्या भरवश्यावर ग्राहक सुरक्षित म्हणून बँकांमध्ये पैसे ठेवतात, पण तेही कितपत सुरक्षित याबाबत शंकाच उपस्थित केली जात आहे.

पाच वर्षापूर्वी तर एटीएममध्ये पैसे भरणार्‍या खासगी कर्मचार्‍याने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. तरीही एखादा अपवाद वगळता बँकांनी पैसे भरण्यासाठी खासगी एजन्सीलाच ठेका दिलेला आहे.

एटीएमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलिस सातत्याने बँकांना पत्रव्यवहार करतात. यापूर्वी बँकेच्या अधिकार्‍यांची बैठकही घेतली आहे. बँकांनी सुरक्षेबाबत ठोस उपाय-योजना करण्याची गरज आहे.
– अजय सिंदकर , पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग

पोलिस राबले…पदरी निराशाच

देशिंग येथे एटीएम टाटा सुमोमधून पळवून नेले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पंधरा दिवस शोधासाठी राबले. अगदी शंभर किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. डफळापुरात एटीएम फोडणारे चौघेजण आहेत. त्यांचे सीसीटीव्हीत चित्रण झाले आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यात यश येईल, असा दावा पोलिस यंत्रणा करीत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नावालाच

सर्वच एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही आहेत. मात्र काही सेंटरमधील कॅमेर्‍यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोडतोड होऊन कॅमेरे लोंबकळताना दिसतात. काही ठिकाणी कॅमेर्‍यावर धूळ साचल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत सीसीटीव्हीद्वारे चित्रण कसे होणार, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. बँकेच्या यंत्रणांना याची माहिती आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news