सांगली : स्वच्छ, पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती आवश्यक | पुढारी

सांगली : स्वच्छ, पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती आवश्यक

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती व वापरावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले.

वीज वितरण विभागाच्यावतीने सांगली व विटा येथे ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. सांगलीला विश्रामबाग परिसरातील अभियंता भवनात व विटा शहरातील लीलाताई देशचौगुले विद्यामंदिरात महोत्सवाचा कार्यक्रम झाला. खा. संजय पाटील उपस्थित होते. भागवत म्हणाले, ग्राहकांनी विजेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा वापरावर भर द्यावा. यावेळी एनटीपीसी लि.नोडल अधिकारी विजेंद्रकुमार मीना, महाव्यवस्थापक दीपक रंजन देहुरी, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर उपस्थित होते. यावेळी एकात्मिक ऊर्जा विकास, दीनदयाल ग्रामज्योती, सौभाग्य योजना, सोलार रुफ टॉप, प्रधानमंत्री कुसुम, मुख्यमंत्री सौर कृषिपंप, उच्चदाब वितरण प्रणाली या योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी विविध योजनांची माहिती देणारी नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यकारी अभियंता गोविंद वरपे यांनी आभार मानले. उच्चस्तर लिपिक सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

विविध योजनांची माहिती

दीनदयाल व एकात्मिक ग्रामीण विकास योजनेतून 104 कोटी रुपयांची ग्रामीण व शहरी विद्युत यंत्रणा जाळे बळकटीकरणाची कामे त्यात तीन उपकेंद्र निर्मिती, 4 उपकेंद्रे क्षमतवाढ, 120 किमी नवीन वीज वाहिन्या, 273 वितरण रोहित्रे उभारणी इ. कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. सौभाग्य योजनेतून 2828 कुटुंबाना वीज जोडणी, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून 419 शेतकर्‍यांना पंप वाटप, कृषी धोरणातून 9759 कृषी पंप वीज जोडण्या, उच्चदाब वितरण प्रणालीतून 7600 रोहित्रे उभारून 7723 कृषी वीजजोडण्या (115 कोटी निधीतून), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून 92 कुटुंबांना वीज जोडण्या दिलेल्या आहेत.

Back to top button