सांगली : विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षे शिक्षा | पुढारी

सांगली : विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षे शिक्षा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : क्लासमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल सर्जेराव महादेव शिंदे (वय 52, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) या शिक्षकाला 5 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली.

न्यायालयाने आरोपी शिंदे याला भा.द.वि. कलम 354-अ दोषी धरुन 2 वर्षाची सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिन्याची ज्यादा शिक्षा, तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम 8 प्रमाणे 3 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने जादा सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी : पीडित मुलगी शिंदे याच्या क्लासमध्ये जात होती. दि. 9 ऑक्टोबर 2019 रोजी पीडित मुलगी क्‍लासमध्ये होती. त्यावेळी शिक्षकाने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर मुलीच्या आईने संजयनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक तृप्ती चव्हाण यांनी केला. व जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

Back to top button