सांगलीत ऑनलाईन जुगारावर छापा | पुढारी

सांगलीत ऑनलाईन जुगारावर छापा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्फूर्ती चौकात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला. जुगाराचा हा अड्डा चालविणार्‍या कवलापूर (ता. मिरज) येथील रघुनाथ सदाशिव साळुंखे (वय 26) याला अटक करण्यात आली आहे.

छाप्यात एलसीडी मॉनिटर, सीपीयू, किबोर्ड व साडेचारशे रुपयांची रोकड असा 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई दीपक गट्टे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

स्फूर्ती चौकातील लक्ष्मी अपार्टमेंटसमोरील एका गाळ्यात ऑनलाईन जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच जुगार खेळण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी पलायन केले. रघुनाथ साळुंखे याला पकडण्यात आले.

युरोपियन रोलेट, अंदर बाहर, फन रोलेट, फन टारगेट, ट्रिपल चान्स, रोलेट मिनी टायमर, स्पीन टू-इन, रोलेट स्पीन असे विविध प्रकारचे 60 गेम याठिकाणी सुरू होते. या गेम प्रकरातील 0 ते 36 पैकी कोणत्याही अंकावर एक रुपयापासून पाच हजारांपर्यंत रक्कम लाऊन घेतली जात होती. फिरवून येणार्‍या आकड्यावर एक रुपयास 36 रुपये, असा भाव दिला जात होता. त्यामुळे खेळण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती.

गेल्याच आठवड्यात स्टेशन चौकातही ऑनलाईन जुगार अड्ड्यावर खेळण्याच्या वादातून मारामारी झाली होती. काही जणांनी या अड्ड्यावर हल्ला करून तेथील संगणक, खुर्च्यासह अन्य साहित्याची मोडतोड केली होती. याची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे अन्वेषणने विश्रामबाग हद्दीत ही कारवाई
केली.

Back to top button