इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच मलगुंडेंवर गुन्हा | पुढारी

इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच मलगुंडेंवर गुन्हा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांना पक्षाबद्दल एवढा कळवळा होता, त्या पक्षाशी एकनिष्ठ होत्या तर त्यांनी ईश्वरपूर नामकरणाला का विरोध केला, असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) आनंदराव पवार यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केला. प्रतिभा शिंदे यांचा बोलवता धनी राष्ट्रवादीच असून त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी काहीही संबंध नसताना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांचे गुन्ह्यात नाव घातले, असा आरोपही त्यांनी केला.

आनंदराव पवार म्हणाले, शिंदे यांच्या पतींना मारहाण झाली तेव्हा सागर मलगुंडे इथे नव्हतेच. शिंदे यांनीच फोन करून मारहाणीची कल्पना त्यांना दिली. तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून मलगुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून याची खातरजमा करावी. शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी करून ईश्वरपूरला विरोध केल्याने संतप्त शिवसैनिकांनीही ही मारहाण केली असू शकते.

ते म्हणाले, शिवसेनेमुळे शिंदे या नगरसेविका झाल्या. तरीही त्यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेवून पक्षाशी गद्दारी केली. शहराच्या नामांतरणाला विरोध केल्यापासून त्यांचा व आमचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिंदे गटात येण्यासाठी दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्या पतींना मारहाण झाल्यानंतर दवाखान्यात राष्ट्रवादीचेच पदाधिकारी होते. त्यामुळे त्या राष्ट्रवादीचे काम करतात, हे स्पष्ट होत आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून स्क्रीप्ट…

आनंदराव पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी पक्षात बंड केले. परंतु प्रतिभा शिंदे म्हणतात की, गेल्या दोन महिन्यापासून शिंदे गटात येण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. मग शिंदेचे बंड होणार, हे महिनाभर आधीच त्यांना कळाले होते काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना स्क्रिप्ट तयार करून देताना तरी व्यवस्थित करून द्यायची होती, असा टोलाही त्यांनी लगावला.

Back to top button