अपहरण : बाळाच्या भेटीने आईचा हंबरडा; पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव | पुढारी

अपहरण : बाळाच्या भेटीने आईचा हंबरडा; पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

सांगली; पुढारी वृत्तसेवा : नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढविलेला गर्भ…अवघ्या 24 तासांपूर्वी त्याला दिलेला जन्म…अन् दहा मिनिटांपूर्वी त्याला शांत करून पाळण्यात झोपविले असताना त्याचे अचानक अपहरण झाल्याने…बाळाच्या आई, आजीने रुग्णालयात अक्षरश: हंबरडा फोडला.

क्षणात बाळ गायब झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. बाळ सापडेल का नाही, या प्रश्‍नाने सार्‍यांनी धसका घेतला; पण सांगली पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठतेपणामुळे बाळ अवघ्या सहा तासात आणि तेही सुखरूप सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला. बाळाला सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात दिल्याने तासगाव, विटा आणि सांगली पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रविवारी सकाळी आठ वाजता बाळाचे अपहरण झाले. अवघ्या काही क्षणात तासगाव पोलिस दाखल झाले. तेथील गुन्हे प्रगटीकरण शाखेतील अनुभवी पोलिसांनी प्रथम रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज कॅमेर्‍यातील फुटेज तपासले. त्यानंतर तपासाला योग्य दिशा देण्यात आली. भरदिवसा एका दिवसाच्या बाळाचे अपहरण झाल्याच्या घटनेची जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर विटा पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकालाही या प्रकरणाचा छडा लावून बाळाला सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात देण्याची सूचना केली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण, तासगाव व विटा पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला.

संशयित स्वाती माने हिने बाळाचे अपहरण करून थेट तासगावचे बसस्थानक गाठले. तेथून ती थेट विट्याला रवाना झाली. पोलिस मागावर असल्याची तिला कुणकूण लागली. पोलिसांच्या तपासाची दिशा बदल्याने तिने रस्ता बदलला. ती थेट वाळवा तालुक्यात घुसली. भवानीनगर येथून रेल्वेने जाण्याचा तिने बेत आखला होता. तोपर्यंत पथक तिच्यापर्यंत पोहोचले.

स्वाती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आहे. दि. 20 जुलैरोजी ती नोकरी मागण्यासाठी या प्रसूती रुग्णालयात गेली. दि. 22 जुलैरोजी तिला परिचारिकेची नोकरी देण्यात आली. दोन दिवस तिने व्यवस्थित काम केले. पण, तिला बाळ चोरून न्यायचे असल्यानेच तिने नोकरी मिळविली असण्याची शक्यता आहे. बाळ पळविण्याचा तिचा पूर्वनियोजित कट होता. कुणालाही संशय येऊ नये, अशाप्रकारे ती रविवारी सकाळी कामावर आली. साडी बदलून तिने ड्रेस परिधान केला. बाळाला तिने बॅगेत घालून पलायन केले. सहा तास बाळ तिच्या ताब्यात होते. ते खूप रडले, पण तिला कोणतीही दयामाया आली नाही. तासगाव सोडल्यानंतर तिने बाळाला हातात घेतले. बॅगेतून काढल्याने बाळ बचावले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. केवळ पोलिसांच्या सखोल तपासामुळे ते सापडले. बाळाला सुखरुप पाहून आई व आजीने हंबरडा फोडला. तासगाव पोलिस ठाण्यात बाळासाठी पाहण्यासाठी नातेवाईकांची रांग लागली होती.

सहा तास बाळ उपाशी…

स्वाती माने हिच्या ताब्यात हे बाळ सहा तास होते. तिला या बाळाची कोणतीही दयामाया आली नाही. बाळ उपाशीच राहिले. पोलिस पकडतील, या भीतीने ती वाट दिसेल तिकडे प्रवास करीत होती. बाळ खूप रडलेही. काही जणांनी तिला बाळ का रडत आहे, अशी विचारणाही केली. मात्र, तिने बाळ आजारी असल्याचे सांगितले.

Back to top button