लोकसभा, विधानसभा आरक्षणासाठी लढा | पुढारी

लोकसभा, विधानसभा आरक्षणासाठी लढा

सांगली : पुढारी वृत्तसेवा ओबीसी आरक्षण संदर्भात राज्यभर मेळावे, आंदोलन करून लढा दिला. त्यामुळे आयोग स्थापन करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम झाले. यापुढे लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी लढा उभारायचा आहे. त्यासाठी मंडल दिनानिमित्त 7 ऑगस्टला पुणे येथे बैठक घेऊन पुढील भूमिका घेण्याबाबतचा निर्णय आज येथे झालेल्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी कार्यकर्त्यांची येथे बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय विभुते म्हणाले, न्यायालयाने ओबीसी समाजाच्या बाजूने निकाल दिला. याबद्दल सर्वोच्च न्यायालय व महविकास आघाडी सरकारला धन्यवाद देत आहोत. लढाई अजून संपलेली नाही, भविष्यात आपल्याला जोपर्यंत लोकसभेत आणि राज्यसभेत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवावा लागेल.

यासाठी गाव निहाय ओबीसींची बांधणी करून सर्वांना एक करूया. राज्य समन्वयक अरुण खरमाटे म्हणाले, राज्यामध्ये ओबीसी संघटनांनी संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे यश संपादन झाले. येणार्‍या 7 ऑगस्टला पुणे येथे मंडल दिनानिमित्त होणार्‍या मेळाव्यास सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव येणार आहेत. माजी महापौर मैनुद्दीन बागवान म्हणाले, आरक्षणाचे महत्त्व खूप आहे.आरक्षणामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळतो. यासाठी समाजाने इथून पुढच्या लढ्यात एकसंघ राहणेे गरजेचे आहे. सुनील गुरव यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस नगरसेवक संतोष पाटील, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संग्राम माने, राज्य महिला प्रतिनिधी अर्चना पांचाळ, माजी बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, दिनकर पतंगे, धनपाल माळी, आनंदराव वाघमोडे आदी उपस्थित होते.

Back to top button