तासगावच्या ‘त्या’ नशेखोरावर गुन्हा दाखल | पुढारी

तासगावच्या ‘त्या’ नशेखोरावर गुन्हा दाखल

तासगाव : पुढारी वृत्तसेवा तासगाव शहरातील विटा नाका येथे दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढून रात्रीच्या वेळेस दंगा केल्याप्रकरणी प्रशांत केशव माळी (रा. तासगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माळी हा दारू पिऊन दंगा करू लागला. यावेळी त्याने शेजारीच असणार्‍या विजेच्या खांबावर चढून तब्बल पाऊण तास लोकांच्या नाकी नऊ आणले होते. यावेळी वीजप्रवाह बंद असल्याने माळी याला कोणतीही इजा झाली नाही.

दरम्यान, विजेच्या खांबावर कोणीही कसा चढू शकतो, हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. तासगाव शहरातील विटा नाका या प्रचंड रहदारी आणि भरवस्तीतील एका विजेच्या खांबावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माळी हा मद्यपान करून वर चढला. हे पाहून काही जणांनी एमएसईबीच्या अधिकार्‍यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तेथील वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र त्यानंतर तब्बल अर्धा पाऊण तास हा वर चढलेला माणूस खांबावर बसून होता. तारांवर चालून सर्कस करत होता. बघणार्‍या सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. वरून पडून मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. दरम्यानच्या काळात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक आले. तोपर्यंत माळी याला खाली घेण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दरम्यानच्या काळात या परिसरातील विटा – सांगली रस्ता व तासगाव – चिंचणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. माळी याच्यावर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.

Back to top button