सांगली : आष्ट्यात अनेकजण अडकले ‘हनीट्रॅप’मध्ये? | पुढारी

सांगली : आष्ट्यात अनेकजण अडकले ‘हनीट्रॅप’मध्ये?

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार – पाच दिवसांपासून आष्टा शहरातील ‘हनीट्रॅप’ प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात काही राजकीय पदाधिकारी, समाजसेवक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर गुंतले आहेत. संबंधित विवाहित महिलेने एका माजी नगरसेवकाच्या मदतीने त्यांची लाखो रुपयांची लूट केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी केली असून याबाबतचे निवेदन आष्टा पोलिसांना दिले आहे.

या प्रकरणातील संबंधित महिला व एका माजी नगरसेवकाने शहरातील अनेकांना यामध्ये गुंतविले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याचे बोलले जात आहे. या कथित प्रकरणाने आष्टा शहराची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील महिला कोण? माजी नगरसेवक कोण? यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे? यामध्ये शहरातील कितीजण व कोणकोण अडकले आहेत, याचा पोलिसांनी सखोल तपास करून सत्य उघडकीस आणावे, अशी मागणी नागरिकांमधूनही करण्यात येत आहे.

या प्रकरणातील संबंधित महिला व माजी नगरसेवक हे एकाच पक्षात काम करीत होते. त्यामुळे एकमेकांचा परिचय व ओळख होती.त्यामुळेच त्यांच्यामध्ये नको इतकी जवळीक निर्माण झाली होती. एक महिन्यापूर्वी सदरची महिला अचानक घरातून बेपत्ता झाली. याचा जाब विचारून या महिलेच्या पतीने माजी नगरसेवकाला शिवीगाळ व मारहाण केली होती. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिली होती.परंतु या माजी नगरसेवकाने हे प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचू दिले नाही. या प्रकरणातील सर्व घटनांचे व्हीडीओ शूटिंग करण्यात आले आहे. तसेच या व्हीडीओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून यामध्ये अडकलेल्या संबंधितांकडून ब्लॅकमेल करून लाखो रुपये व सोन्याचे दागिने उकळले असल्याचे शहरात सर्वत्र बोलले जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

Back to top button