विट्यात सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

विट्यात सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यातील एका मोटारसायकल चोरीचा तपास करीत असताना सोलापूर जिल्ह्यातील दोघा चोरट्यांकडून तीन ठिकाणच्या चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विटा पोलिसांना यश आले. अक्षय संजय पाटोळे (वय 23) आणि राजेंद्र ज्ञानदेव चव्हाण (दोघेही रा. सुळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील भेंडवडे येथील जीवन महीपाल कांबळे यांची मोटारसायकल 28 जूनरोजी विटा बसस्थानकाच्या पाठीमागील जागेतून चोरीला गेली होती. या चोरीचा तपास चालू होता. याप्रकरणी संशयित अक्षय पाटोळे व राजेंद्र चव्हाण या दोघांना अटक केली होती. या चोरीचा अधिक तपास करताना या दोघांनी मोटारसायकल (एम एच 03, सीई, 5721) अंदाजे किंमत 50 हजार रुपये, एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची मोटारसायकल अंदाजे किंमत 35 हजार रुपये आणि काळे रंग, पांढरे व राखाडी रंगाचे पट्टे असलेली मोटारसायकल अंदाजे किंमत 40 हजार रुपये अशा एकूण सव्वा लाख रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकलींच्या चोर्‍या उघडकीस आणण्यास यश आले आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी विटा पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस कर्मचारी अमरसिंह सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, सायबर क्राईमचे पोलिस कर्मचारी कॅप्टन गुंडवडे यांनी तपासात सहभाग घेतला.

Back to top button