

सांगली; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे यांच्या घरातील गुप्तधन शोधून देण्यासाठी मांत्रिक आब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबाकडून 50 लाखांची रक्कम घेतली होती, अशी माहिती तपासातून पुढे येत आहे.
बागवान गुप्तधन शोधून देत नसल्याचे लक्षात येताच त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्याने त्याने कुटुंबाच्या हत्येचा कट रचल्याची कबुली अटकेत असलेला त्याचा साथीदार धीरज सुरवशे याने शुक्रवारी दिली आहे. कर्जास कंटाळून वनमोरे कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याचे सुुरुवातीला दिसून आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी कुटुंबातील सर्वांचे मोबाईल 'कॉल डिटेल्स' काढले. यातून मांत्रिक व गुप्तधानाचा मुद्दा तपासातून पुढे आला. त्यादृष्टिने तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली. मांत्रिक आब्बास मुल्ला व धीरज सुरवशे या दोघांची नावे निष्पन्न झाली.
दोन दिवसांपूर्वी दोघांना सोलापुरातून अटक करण्यात आली. सुरवशे सध्या पोलिस कोठडीत आहे तर बागवान छातीत दुखत असल्याने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल आहे. न्यायालयाने बुधवारी त्याला अटक करण्याची परवानगी दिली होती.
त्यानुसार पोलिस रुग्णालयात गेले. पण, पुन्हा त्याने छातीत मोठ्या प्रमाणात दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला आता अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. गुरुवार, दि. 30 जून रोजी पोलिस अधिकारी वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करून बागवानच्या अटकेबाबत निर्णय घेणार आहेत.
अटकेतील सुरवशेची कसून चौकशी करण्यात येत आहे. बुधवारी त्याने 19 जून रोजी सोलापुरातून म्हैसाळला येण्यासाठी किती वाजता निघालो? वाटेत कुठे थांबलो? म्हैसाळमध्ये आल्यानंतर गाडी कुठे लावली? वनमोरे यांच्या घरात किती वाजता जेवण केले? घरात किती वेळ होतो? कशाप्रकारे नऊ जणांची हत्या केली? जेवणाची भांडी कधी धुतली? याची सर्व माहिती दिली असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले. बागवानकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम पुढे येईल. येेत्या एक-दोन दिवसांत सर्व घटना पुढे येईल, असेही सिंदकर म्हणाले.
गेल्या सहा महिन्यांपासून वनमोरे कुटुंब बागवानच्या संपर्कात होते. गुप्तधन देण्यासाठी बागवानने 80 लाखांची मागणी केली होती. चर्चेअंती 50 लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम वनमोरे कुटुंबाने दिलीही होती. त्यानंतर बागवानने वनमोरे यांच्या घरी येऊन एक-दोन वेळा पूजाही केली होती. पण, प्रत्यक्षात त्याने गुप्तधन शोधून दिलेच नाही.
बागवान गुप्तधन शोधून देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच कुटुंबाने त्याच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. कुटुंबाने पैशासाठी फारच तगादा लावल्याने बागवानने कुटुंबातील सर्वांच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती सुरवशेने पोलिस चौकशीत दिली आहे. सुरवशे हा 2014 पासून बागवानकडे काम करतो. सोलापुरात त्याच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर तो राहतो. 19 जूनला दोघेही म्हैसाळला येेण्यासाठी सोलापुरातून दुपारी चार वाजता निघाले होते.
मिरज ग्रामीण पोलिसांनी बुधवारी सुरवेशला म्हैसाळ येथे घटनास्थळी नेले होते. त्याच्याकडून घटनाक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता त्याला नेण्यात आले होतेे. तासभर त्याला घेऊन पोलिस घटनास्थळी होेते.