सांगली : सराफी दुकान फोडून 17 लाखांचा मुद्देमाल चोरीस | पुढारी

सांगली : सराफी दुकान फोडून 17 लाखांचा मुद्देमाल चोरीस

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील मुख्य बाजारपेठेतील ओम गणेश ज्वेलर्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा 17 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी पहाटे ही घटना घडली. मुख्य पेठेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे आटपाडी शहरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मुख्य बाजारपेठेत शंकर रघुनाथ चव्हाण (वय 45 रा. य.पा.वाडी, ता.आटपाडी) यांचे ओम गणेश ज्वेलर्सचे दुकान आहे. चव्हाण हे रविवारी रात्री हे दुकान बंद करून गेले होते. सोमवारी पहाटे हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले.
चोरट्यांनी दुकानातील सात किलो वजनाची व 2 लाख 10 हजार रुपये किंमतीची चांदीची झूमझूम पैंजण, 1 लाख 95 हजार किंमतीची व साडेसहा किलो वजनाची लहान पैंजण, 90 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या मुर्त्या, करंडा, ताट, ग्लास, 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे व साडेचार किलो वजनाचे चांदीचे आगरा पायल, 5 लाख रुपये किंमतीची 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांची मोड व 5 लाख 75 हजारांची रोख रक्कम, असा एकूण 17 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

दरम्यान, पहाटे झालेल्या या चोरीची माहिती मिळताच शंकर चव्हाण यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी चोरी झालेल्या दुकानाच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचारण केले आहे. पोलिसांनी तपासासाठी शोधपथके रवाना केली आहेत.

या चोरट्यांनी आटपाडी- सांगोला रस्त्यावरील मुलानकी वस्तीवरील ईकोकार चोरली आहे. त्या कारमधून ते आटपाडी येथे आले आहेत. येथे चोरी करून ते पुन्हा कारमधून पळून गेले आहेत. चोरट्यांनी सदरची कार सांगोला तालुक्यात सोडून पलायन केले. चोरीची पद्धत पाहता सराईत गुन्हेगारांच्या टोळीने ही धाडसी चोरी केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. आटपाडी तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button